अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या रिमझिम आणि काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकतीच केलेल्या पेरणीनंतर पिकांचे अंकुर उगवण्यास सुरुवात झाली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून संपूर्ण शेती जलमय झाली आहे. त्यामुळे उगवलेले अंकुर पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील शेतकरी गजानन जंजाळ यांच्या शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.