पालघर जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांच्या आमरण उपोषणाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. वाडा येथे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आंदोलकांच्या मागण्या मांडल्या. यावेळी शिक्षक भरतीतील आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. तब्बल 72 दिवसांच्या धरणे आंदोलनानंतर आणि सहा दिवसांच्या आमरण उपोषणानंतर शासनाने या प्रश्नाची दखल घेतली आहे. मात्र, आरक्षणाचा प्रश्न प्रत्यक्ष मार्गी लागेपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.