पश्चिम रेल्वेवरील सफाळे रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या मागणीसाठी नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे फाटक बंद असल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. या धोकादायक परिस्थितीत गेल्या आठवडाभरात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जीवाची पर्वा न करता रेल्वे रूळ ओलांडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वारंवार आंदोलने आणि निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने आता हा आवाज थेट रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.