गडचिरोलीच्या सिरोंचा आणि टेकडा ताला परिसरात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून, वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या भागातील सुमारे ७५ टक्के कापसाची वेचणी अजून बाकी आहे. अशा परिस्थितीत पावसाने झोडपल्यामुळे अंदाजे २०० हेक्टरवरील कापूस काळवंडला असून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सिरोंचा यंदा मजुरांच्या तुटवड्यामुळे आणि काही तांत्रिक कारणांमुळे कापूस वेचणीला उशीर झाला होता. साधारण ७५ टक्के कापूस अजून शेतातच उभा असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान केले.