Maval Singer Sakubai Lanke Viral Video: जपलेली कला माणसाला जगायला शिकवते अन् आयुष्य समृद्ध करते असं म्हणतात. कलेला वयाचं, परिस्थितीचे बंधन नसते. सोशल मीडियावर असे अनेक कलाकार रातोरात प्रसिद्ध झालेत, ज्यांनी सर्वांनाच वेड लावले. सध्या मावळमधील 48 वर्षीय सखुबाई लंके यांनीही आपल्या आवाजाने सर्वांना वेड लावलं आहे. घरातील चुल आणि मुल सांभाळत सखुबाईंनी जपलेल्या कलेचं सर्वत्र कौतुक होत असून अनेक स्त्रियांपुढे त्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे.
झोपडीत गुंजतोय जादुई आवाज!
सखुबाई लंके या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील घोणशेत गावातील राहणाऱ्या साध्या गृहिणी. लहान वयात लग्न, घरची गरिबी, मुलांची अन् संसाराचा गाडा हाकण्याच्या जबाबदारीमुळे त्यांनी स्वतःच्या कलेकडे कधी लक्ष दिले नाही. मात्र आता सोशल मीडियावर त्यांनी आपल्या जादुई आवाजातील गाणी रेकॉर्ड करायला सुरुवात केली अन् बघता बघता या गाण्यांनी नेटकऱ्यांना वेड लावले.
Success Story: 3 दिवसात 1 कोटीची कमाई.. जुन्या लँडलाईनची कमाल; काय आहे भन्नाट आयडिया?
सखुबाई त्यांच्या घरामध्येच कोणताही मोठा स्टुडिओ किंवा आधुनिक सेटअप न करता व्हिडिओ रेकॉर्ड करतात. त्यांचा हाच साधेपणा, आवाजातील गोडवा नेटकऱ्यांच्या काळजाला भिडत आहे. लता मंगेशकर यांच्यासह अनेक जुनी गाणी त्यांनी आपल्या आवाजात रेकॉर्ड केली. बघता बघता त्यांच्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
संसाराचा गाडा हाकत कला जपली...
त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर लाखो व्ह्यूज अन् प्रतिक्रियांसह कौतुकाचा वर्षाव होत आहे. सखुबाई यांचे इंन्टाग्रामवर 27000 फॉलोअर्स आहेत. त्यांनी गायलेल्या पन्ना की तमन्ना, सत्यम शिवम सुंदरम, दिल तो है दिल.. अशा गाजलेल्या गाण्यांचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. ह्याला म्हणतात खरं टॅलेंट म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे. मोठ्या स्पर्धेत भाग घ्या, 100 टक्के जिंकाल, असं म्हणत त्यांना प्रोत्साहनही दिले आहे.
सखुबाई लंके यांची ही सुंदर सक्सेस स्टोरी कलेला परिस्थितीचं, वयाचं कशाचेही बंधन नसते. ती गरिबाच्या झोपडीतही खुलते अन् यशाच्या शिखरावर पोहोचवते हेच दाखवून दिले आहे. प्रत्येकाच्या अंगात कला असते फक्त ती ओळखून त्यावर मेहनत करण्याची गरज आहे. कलेला प्रामणिकपणा अन् सातत्याची जोड दिली की ती रातोरात यशाच्या शिखरावर पोहोचते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world