लेबनानमध्ये पेजरचे स्फोट घडवत हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. हे आरोप इस्रायलने ना फेटाळलेत ना कबूल केलेत. इस्रायलने 28 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. त्यामुळे हा हल्लादेखील इस्रायलनेच केला असावा असा संशय आहे. 1996 साली इस्रायलने यहिया अब्दल-तीफ अय्याश नावाच्या दहशतवाद्याला यमसदनी पाठवलं होतं. मोबाईल तंत्रज्ञान तेव्हा विकसित होऊ लागलं होतं. मोबाईल कमी लोकांच्या हाती आले होते. यहिया फोनवर बोलत असताना मोबाईलचा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की यहियाचे शिर धडावेगळे झाले होते. इस्रायलने आपल्या बदला पूर्ण केला होता, याची सुरुवात कुठून आणि कशी झाली ते आपण जाणून घेणार आहोत.
बस बॉम्स्फोटाने इस्रायल हादरले
दिवस होता 19 ऑक्टोबर 1994. इस्रायलच्या तेल अवीव भागातील डिजेनगोफ परिसर हा गजबजलेला परिसर होता. या रस्त्यावर असलेल्या कॅफे, बार, विविध दुकाने यांमुळे दिवसरात्र इथे वर्दळ असायती. डिजेनगोफ रस्त्यावरून एक बस जात होती. लाल-पांढर्या रंगाच्या या बसमधून सालेह अब्देल रहीम अल-सौवी नावाचा माणूस प्रवास करत होता. वरकरणी थंड दिसणारा सालेह मनातून भयंकर अस्वस्थ होता. तो संतापलेला होता आणि त्याला इस्रायलला धडा शिकवायचा होता. रागाचं कारण होतं सालेहचा भाऊ हसीन. सॅम्युअल कॅटज यांनी द हंट फऑर इंजिनिअर नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये सगळा घटनाक्रम तपशीलवार देण्यात आला आहे. पुस्तकात सालेह इस्रायलवर का संतापला होता याचे कारणही देण्यात आले आहे. सालेहचा भाऊ हसिनला 1989 साली इस्रायली सैन्याने ठार मारले होते. या हत्येचा सालेहला बदला घ्यायचा होता. यासाठी तो या बसमध्ये बसलेला होता. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सालेह आपल्या सीटवरून उठला. त्याने त्याच्यासोबत एक बॅग आणली होती. सीटवरून उठल्यानंतर सालेहने आपल्या जॅकेटच्या आत असलेला स्विच दाबला. स्विचची वायर ही त्याच्यासोबत असलेल्या बॅगेसोबत जोडलेली होती. काही कळायच्या आत एक भीषण स्फोट झाला.
(नक्की वाचा- खोटी कंपनी बनवली आणि 'पप्पू' पेजरला बॉम्ब बनवण्यासाठी इस्रायलनं वापरलं असं डोकं की..)
20 किलो टीएनटीचा स्फोट
हा स्फोट महाभयंकर असा होता. स्फोटासाठी 20 किलो टीएमटी हे स्फोटक वापरण्यात आले होते. स्फोटाची तीव्रता वाढवण्यासाठी नट बोल्टचाही वापर करण्यात आला होता. या स्फोटामुळे बसचा लोखंडी खोका, चेसिसपासून वेगळा झाला होता. शेजारून जाणाऱ्या बसच्या खिडक्यांचा चक्काचूर झाला होता. प्रवाशांच्या शरीराचे तुकडे होरपळून जवळच्या इमारतींवर जाऊन पडले होते. या स्फोटामुळे डिजेनगोफ परिसरात हलकल्लोळ माजला होता. या स्फोटात 21 लोकांचा मृत्यू झाला होता तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते. हा स्फोट सालेहने घडवून आणला होता मात्र याचा मास्टरमाईंड वेगळाच होता.
( नक्की वाचा : पेजरनंतर वॉकी-टॉकीमुळे हादरलं Lebanon, अनेकजण जखमी, पाहा Video )
यहिया उर्फ इंजिनिअर
यहिया अब्दल-लतीफ अय्याश या अवघ्या 28 वर्षांच्या तरुणाने हा स्फोट घडवून आणला होता. तोच या स्फोटाचा मास्टरमाईंड होता. पाश्चिमात्य देशांनी यहियाला 'द इंजिनिअर' असं टोपणनाव दिलं होतं. विध्वंसक विचारांच्या असलेल्या यहियाने 6 एप्रिल 1994 रोजी पहिला दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. एका कारच्या गैस सिलेंडरला स्फोटकं, खिळे जोडून त्याने कार एका शाळेसमोर नेऊन उभी केली होती. 2 वर्षात यहियाने घडवून आणलेल्या स्फोटांमध्ये इस्रायलमधल्या 150 जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले.
इंजीनियर होण्याचे स्वप्न, बनला दहशतवादी
यहिया हा एका शेतकरी कुटुंबात जन्माला आला होता. 1966 साली तो जन्माला आला होता. लहानपणापासून तो अभ्यासात हुशार होता. त्याने आपले शिक्षण हे उत्तम मार्कांनी पूर्ण केले होते. रफतमध्ये तो टीव्ही आणि रेडियो दुरुस्त करण्याचे काम करत होता. रामल्लाच्या बिरज़ेत विद्यापीठातून त्याने इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. 1991 साली त्याने बीएससी ऑनर्सची पदवी प्राप्त केली होती. पुढच्या शिक्षणासाठी त्याला परदेशात जायचे होते, मात्र इस्रायली अधिकाऱ्यांनी त्याला परदेशी जाण्याची परवानगी नाकारली होती. याचा राग आल्याने यहियाने दहशतावादाचा मार्ग स्वीकारला आणि तो हमास या दहशतवादी संघटनेत सामील झाला.
इस्रायलसाठी यहिया बनला मोठी डोकेदुखी
यहियाला परदेशी जाण्याची परवानगी मिळाली असती तर कदाचित भविष्यात होणारा रक्तपात झाला नसता. असं म्हणतात की, भविष्यात जे होणार असतं ते आपण कधीही टाळू शकत नाही. इस्रायलच्या बाबतीतही तसेच घडले. 1994 साली केलेल्या पहिल्या स्फोटानंतर इस्रायली सुरक्षा यंत्रणा हादरली होती. यहियाला शोधण्यासाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने हाचलाची सुरू केल्या. 11 जुलै 1994 रोजी यहियाचा खास मित्र अली उस्मान याला सुरक्षा यंत्रणांनी पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चकमकीत तो ठार मारला गेला. यानंतर पुढचे 18 महिने यहिया इस्रायलला चकवण्यात यशस्वी ठरला होता. यहियाला इराण, सूदानला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र कुटुंबावर असलेल्या प्रेमामुळे तो गेला नाही. विविध रुपे घेऊन तो आपल्या आई-वडिलांना भेटत राहिला. त्याने महिलेचा आणि इस्रायलची सैनिकाचा वेश धारण करूनही आपल्या घरच्यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते.
(नक्की वाचा- मोबाइलच्या जगात हिजबुल्लाह का वापरत आहेत पेजर? स्फोट नेमके कसे झाले?)
मोबाईलचा माग लागला
यहिया हा गाझामध्येच लपला असून तो इतर देशात जाण्यास तयार नसल्याचे इस्रायलला कळालं होतं. 1995 साली इस्रायलला यहिया मोबाईल वापरत असल्याचं कळालं. गाझामध्ये त्याचा मित्र ओसामा हमाद याने त्याच्या नातेवाईकाच्या घरी यहियाच्या राहण्याची व्यवस्था केली होती. ‘अब्दुल्ला अबू अहमद' असं नाव त्याने धारण केलं होतं. यहिया इथेच फसला. कारण त्याला याची कल्पना नव्हती की तो ज्या घरात राहात होता त्या घराचा मालक आणि ओसामाचा काका कमाल हमाद हा इस्रायली गुप्तचर संस्थेला खबरी पुरवण्याचे काम करत होता.
मोबाईललाच बनवले शस्त्र
इस्रायलच्या तपास आणि संरक्षण यंत्रणेला माहिती मिळाली होती की यहियाने 25 डिसेंबर 1995 रोजी त्याच्या घरच्यांसोबत बराचवेळ फोनवरून बाचतीच केली होती. 5 जानेवारी 1996 ला पुन्हा फोन करेन असे त्याने सांगितले होते. ज्या फोनवरून यहिया बोलत होता तो मोबाईल फोन कमालने यहियाला भेट म्हणून दिला होता. 4 जानेवारीला कमालने हा फोन यहियाकडून घेतला होता. या मोबाईलमध्ये स्फोटके बसवण्यात आली. ही स्फोटके रिमोटने ट्रिगर करता येतील अशी होती. 5 जानेवारीला यहियाने त्याच्या वडिलांना फोन केला. 'कसे आहात' हे यहियाचे शेवटचे शब्द होते,कारण यानंतर स्फोट झाला आणि यहियाचे डोके धडावेगळे झाले. यहियाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी यानंतर बॉम्बस्फोट घडवले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world