निवडणूक 2026
तुमच्या प्रश्नांची उत्तरे
निकालाचा काउंटडाऊन
2025 Assembly Elections All Your Questions Answered
महाराष्ट्रात किती महानगरपालिकांसाठी निवडणूक आहे?
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात झाली. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
2. कोणत्या महापालिकांसाठी निवडणूक होतेय?
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मित महानगरपालिका आहेत. पाच महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये संपलीय. सर्वाधिक 18 महानगरपालिकांची मुदत 2022 मध्ये संपली होती; तर चार महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपलीय.
3. महानगरपालिका आणि त्यांची मुदत कधी संपली? याचा तपशील
- छत्रपती संभाजीनगर: 27 एप्रिल 2020
- नवी मुंबई: 07 मे 2020
- वसई- विरार: 28 जून 2020
- कल्याण- डोंबिवली: 10 नोव्हेंबर 2020
- कोल्हापूर: 15 नोव्हेंबर 2020
- नागपूर: 04 मार्च 2022
- मुंबई: 07 मार्च 2022
- सोलापूर: 07 मार्च 2022
- अमरावती: 08 मार्च 2022
- अकोला: 08 मार्च 2022
- नाशिक: 13 मार्च 2022
- पिंपरी- चिंचवड: 13 मार्च 2022
- पुणे: 14 मार्च 2022
- उल्हासनगर: 04 एप्रिल 2022
- ठाणे: 05 एप्रिल 2022
- चंद्रपूर: 29 एप्रिल 2022
- परभणी: 15 मे 2022
- लातूर: 21 मे 2022
- भिवंडी- निजामपूर: 08 जून 2022
- मालेगाव: 13 जून 2022
- पनवेल: 9 जुलै 2022
- मीरा- भाईंदर: 27 ऑगस्ट 2022
- नांदेड- वाघाळा: 31 ऑक्टोबर 2022
- सांगली- मीरज- कुपवाड: 19 ऑगस्ट 2023
- जळगाव: 17 सप्टेंबर 2023
- अहिल्यानगर: 27 डिसेंबर 2023
- धुळे: 30 डिसेंबर 2023
4. नव्याने तयार झालेल्या महापालिका कोणत्या आहेत, ज्यांची निवडणूक जानेवारी 2026 मध्ये होणार आहे?
जालना आणि इचलकरंजी
5. कोणत्या महानगरपालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहेत?
मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान तीन ते पाच मतं देणं अपेक्षित असेल.
6. महानगर पालिका निवडणुकीत किती मतदार असतील?
महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलीय. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आलीय.
7. महापालिका निवडणुकीसाठी किती EVM वापरण्यात येणार आहेत?
29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलीय.
8. आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?
आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) ही भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेली एक नियमावली आहे, जी निवडणुकांसाठी लागू होते. या आचार संहितेचा उद्देश निवडणूक प्रक्रियेला पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवणे तसेच सत्ताधारी पक्ष आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग थांबवणे आहे.
9. महानगरपालिका निवडणुकीत किती मतदार सहभागी होतील?
पुरुष मतदार- 1 कोटी 81 लाख 93 हजार 666
महिला मतदार- 1 कोटी 66 लाख 79 हजार 755
इतर मतदार- 4 हजार 596
एकूण मतदार- 3 कोटी 48 लाख 78 हजार 017
एकूण मतदान केंद्र- 39 हजार 147
10. महानगरपालिकांमध्ये प्रभागांचे आरक्षण कशा पद्धतीने आहे?
महानगरपालिकांची संख्या- 29
एकूण प्रभाग-893
एकूण जागा- 2 हजार 869
महिलांसाठी जागा- 1 हजार 442
अनुसूचित जातींसाठी जागा- 341
अनुसूचित जमातींसाठी जागा- 77
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 759
11. आचारसंहिता कधी लागू होते?
आदर्श आचारसंहिता, निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर त्वरित लागू होते आणि मतमोजणीपर्यंत चालू राहते. यामध्ये राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
12. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट म्हणजे काय?
ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन. मतदानासाठी हे यंत्र वापरले जाते. ईव्हीएमचा वापर भारतात पहिल्यांदा 1982 मध्ये केरळच्या परूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत करण्यात आला होता.
ईव्हीएमची रचना
- ईव्हीएम दोन मुख्य युनिट्समध्ये विभागलेली असते.
- कंट्रोल युनिट : मतदान अधिकारी याला नियंत्रित करतो.
- बॅलेटिंग युनिट : मतदार याचा वापर करून मत नोंदवतो.
मतदान केंद्रामध्ये मतदारसंघ निहाय यादी असते जी मतदान यंत्रामध्ये असते. मतदार त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे असलेले बटण दाबतो आणि त्याचे मत नोंदवतो. मत नोंदवल्यानंतर मतदाराला त्याने दिलेले मत योग्य त्या उमेदवाराला गेले आहे की नाही हे तपासण्यासाठी एक पावती दाखवली जाते, ज्याला वोटर वेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट म्हणतात. ही पावती एका बंदीस्त बॉक्समध्ये दिसते, सात सेकंदासाठी ही पावती मतदाराला पाहाता येते. मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक बनवण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर केला जातो.
13. ईव्हीएम सुरक्षित असते का?
ईव्हीएम हे संपूर्णपणे सुरक्षित असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी वारंवार सांगितले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, निवडणुकीआधी पाच-सहा महिन्यांपूर्वी ईव्हीएमचं फर्स्ट लेव्हल चेकिंग होतं. फर्स्ट लेव्हल चेकिंगनंतर ईव्हीएम स्टोरेजमधून बाहेर काढणे, तपासणी करणे, मतदान केंद्रावर घेऊन जाणे, तिथे मतदानानंतर सील करणे, पुन्हा स्टोअर रुममध्ये आणणे, मतमोजणीच्या दिवशी बाहेर काढणे, सील तोडणे या प्रक्रिया पार पडतात. सील तोडले जात असताना उमेदवार किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या प्रतिनिधीसमोर ही प्रक्रिया पार पाडली जाते.
ईव्हीएम वापरासाठी काढलं जातं, तेव्हा त्यामध्ये बॅटरी टाकली जाते. मतदानाच्या पाच-सहा दिवस आधी जेव्हा ईव्हीएम वापरासाठी काढलं जातं, तेव्हा मशीनमध्ये चिन्ह टाकली जातात. त्याचवेळी मशीनमध्ये बॅटरी भरली जाते. या प्रक्रियेदरम्यान मशीनसह बॅटरीवर देखील उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सह्या घेतल्या जातात. त्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये ठेवले जातात. स्ट्राँग रुममध्ये देखील तीन टप्प्यांची सुरक्षा असते. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवसी मशीन बाहेर काढले त्यावेळी देखील तिथे हीच प्रक्रिया असते. सगळी प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद केली जाते. मशीनचे नंबर देखील प्रतिनिधींना शेअर केले जातात. मतदानाप्रमाणेच मतदानानंतर देखील प्रत्येक टप्प्यातील प्रक्रियेत पारदर्शकता बाळगली जाते.
केरळच्या परूर विधानसभा मतदारसंघात मे 1982 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. इथल्या 50 मतदान केंद्रांवर याचा वापर करण्यात आला होता. 1998 साली ईव्हीएमचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीच्या 16 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात ईव्हीएमचा वापर करण्यात आला. ईव्हीएममुळे मतमोजणी वेगवान झाली, 30-40 तासाऐवजी निकाल दोन त तीन तासांत लागू लागले.
14. नोटा म्हणजे काय?
NOTA म्हणजे 'None of the Above' या इंग्रजी शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. निवडणूक आयोगाने NOTA चा पर्याय मतदारांना उपलब्ध करून दिला. मतदारसंघातील उमेदवारांपैकी एकही उमेदवार मतदाराला पसंत नसेल तर तो नोटाचा पर्याय वापरू शकतो. 'नोटा'पूर्वी मतदाराला एकही उमेदवार पसंत नसेल तर तो निवडणुकीवर बहिष्कार घालत होता.
15. मतदार यादीत नाव नसेल तर काय करावे?
मतदार यादीत नाव नसेल तर मतदार जवळच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आपले नाव नोंदवण्यासाठीचा फॉर्म भरू शकतो, ऑनलाईन प्रक्रियेसाठी तो www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतो.
16. व्होटर आयडी नसेल तर कोणती कागदपत्रे ग्राह्य धरली जातात?
जर तुमच्याकडे व्होटर आयडी नसेल, तरीही तुम्ही मतदान करू शकता. निवडणूक आयोगाने पर्यायी कागदपत्रांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मतदार यादीत तुमचे नाव असल्यास तुम्ही खालील कागदपत्रांचा वापर करून मतदान करू शकता:
1.आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. ड्रायव्हिंग लायसन्स
4. भारतीय पासपोर्ट
5. मनरेगा जॉब कार्ड
6. बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक (फोटोसह)
7. श्रम मंत्रालयाने दिलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
8. युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID)
9. खासदार, आमदार, किंवा विधानपरिषद सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र
10. फोटो असलेलं पेन्शन दस्तऐवज
11. केंद्र किंवा राज्य सरकारांच्या सेवा ओळखपत्रे
12. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत नोंदणीकर्ता जनरल ऑफ इंडिया यांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
या कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र तुमच्याकडे असल्यास, तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकता
17. आधार कार्ड दाखवल्यास मतदान करता येते का?
मतदार यादीत तुमचे नाव असल्यास ओळखपत्रासाठी तुम्ही आधार कार्ड दाखवून मतदान करू शकता.
18. पोस्टल बॅलेटचा वापर कोण करू शकतो?
तुम्ही सैन्य दलात काम करत असाल, सरकारी कर्मचारी असाल किंवा निवडणुकीसाठी इतर राज्यात तैनात केले गेले असाल तर तुम्हाला पोस्टल बॅलेटने मत देता येते.
19. NRI मतदान करू शकतात का?
जर विदेशात राहणाऱ्या व्यक्तीने इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारले नसेल आणि तो भारताचा नागरीक असेल आणि त्याचे नाव मतदार यादीत असेल तर तो मतदार म्हणून आपला हक्क बजावू शकतो.
20. बेलवेदर सीट म्हणजे काय?
बेलवेदर सीट म्हणजे कोणत्या पक्षाची सत्ता येईल याचा संकेत देणारे मतदारसंघ. काही मतदारसंघ असे असतात ज्यात प्रचारापासून आणि निकालापूर्वी येणाऱ्या कलांपासूनच निकाल काय लागू शकतो याची चाहूल लागते.
21. मतदारासाठीची पात्रता (Eligibility) काय असते?
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तुम्ही भारताचे नागरिक असावे आणि अर्हता दिनांकाला (Qualifying Date) तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. तुमचे नाव ज्या प्रभागाच्या (Ward) मतदार यादीत आहे, तिथेच तुम्हाला मतदान करता येते.
22. मतदार यादीत (Voter List) नाव कसे तपासायचे?
महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. या अॅपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल. याच अॅपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्राचे ठिकाणही कळू शकेल. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवाराविषयी अधिक माहिती देखील जाणून घेता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळ देखील उपलब्ध करून दिले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून अॅपप्रमाणे ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.
23. मतदान केंद्रावर (Polling Station) जाताना सोबत कोणती ओळखपत्रे (Identity Proof) न्यावीत?
उत्तर: भारत निवडणूक आयोगाने दिलेले 'मतदार ओळखपत्र' (EPIC) सर्वात महत्त्वाचे आहे. ते नसल्यास खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र चालेल:
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (PAN Card)
- पासपोर्ट (Passport)
- ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
- बँक/पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक (Passbook)
- मनरेगा जॉब कार्ड (MGNREGA Job Card)
24. मतदान केंद्रावर गेल्यावर प्रत्यक्ष प्रक्रिया (Voting Process) कशी असते?
मतदान केंद्रात खालील टप्पे असतात:
पहिला अधिकारी: तुमचे नाव मतदार यादीत तपासतो आणि तुमची ओळख पटवून घेतो.
दुसरा अधिकारी: तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई (Indelible Ink) लावतो आणि नोंदवहीवर तुमची सही किंवा अंगठा घेतो.
तिसरा अधिकारी: कंट्रोल युनिट (Control Unit) मधून बॅलट युनिट (Ballot Unit) सुरू करतो.
मतदान कक्ष: तुम्ही पडद्याआड जाऊन ईव्हीएम (EVM) वरील तुमच्या पसंतीच्या उमेदवारासमोरील बटण दाबून मतदान करता.
25. महानगरपालिकेचा कालावधी (Tenure) किती असतो?
महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेसाठी (First Meeting) निश्चित केलेल्या दिनांकापासून 05 वर्षांचा असतो.
26. प्रभाग रचना (Ward Formation) कशी केली जाते?
महानगरपालिका आयुक्त (Commissioner) लगतच्या जनगणनेच्या (Census) आकडेवारीनुसार प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करतात. यावर लोकांकडून हरकती (Objections) मागवल्या जातात आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहीर करतो.
27. महिलांसाठी किती आरक्षण (Reservation) असते?
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार, एकूण जागांच्या 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात. यामध्ये SC, ST आणि OBC महिलांच्या आरक्षणाचाही समावेश असतो.
28. उमेदवारी अर्ज (Nomination Paper) भरण्यासाठी वयाची अट काय आहे?
उमेदवार होण्यासाठी तुमचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
29. दोनपेक्षा जास्त अपत्ये (Two-Child Norm) असल्यास उमेदवार निवडणूक लढवू शकतो का?
नाही. 12 September 2001 रोजी किंवा त्यानंतर ज्या व्यक्तीला तिसरे अपत्य झाले असेल, ती व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र (Disqualified) ठरते.
30. जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) कधी सादर करणे आवश्यक आहे?
जर उमेदवार आरक्षित जागेवरून (Reserved Seat) निवडणूक लढवत असेल, तर त्याने अर्जासोबतच सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
31. उमेदवाराच्या खर्चावर (Election Expenditure) काही मर्यादा असते का?
महानगरपालिकेच्या वर्गवारीनुसार (A, B, C, D Class) ही मर्यादा ठरलेली असते. उमेदवाराने प्रचाराचा प्रत्येक रुपयाचा हिशेब ठेवणे आणि निकाल लागल्यापासून 30 दिवसांच्या आत तो आयोगाला सादर करणे बंधनकारक असते.
32. आचारसंहिता (Model Code of Conduct) म्हणजे काय?
निवडणुकीच्या काळात सर्व पक्ष आणि उमेदवारांनी पाळावयाची नियमावली म्हणजे आचारसंहिता. यामध्ये सरकारी संसाधनांचा गैरवापर करणे, मतदारांना आमिष दाखवणे किंवा धार्मिक तेढ निर्माण करणे यावर बंदी असते.
33. निवडणूक गुन्हे (Election Offenses) कोणते आहेत?
मतदारांना पैसे देणे, दारू वाटणे, मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रचार करणे, मतदारांना घाबरवणे हे सर्व गंभीर गुन्हे आहेत. यात कारावासाची (Imprisonment) शिक्षा होऊ शकते.
34. अनामत रक्कम (Security Deposit) कधी परत मिळते?
जर उमेदवाराला त्या प्रभागात पडलेल्या एकूण वैध मतांच्या (Valid Votes) किमान 1/8 मते मिळाली, तर त्याची अनामत रक्कम निवडणूक प्रक्रियेनंतर परत केली जाते. अन्यथा ती जप्त (Forfeited) होते.
35. मतदार यादीतील दुबार नावे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने काय उपाययोजना केली आहे?
भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही; परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची (इमारती) यादी 20 डिसेंबर 2025 रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 27 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर कार्यवाही करत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन) विकसित केली आहे. इतरही महानगरपालिकांनी विविध तंत्रांचा वापर करून संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेतली आहे.
महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी केली आणि त्यांच्याकडून असा मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.