मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला लागणार असून, त्या दिवशी मुंबईचे नवे कारभारी कोण असतील हे स्पष्ट होईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने युती केली असून काँग्रेस आणि वंचित हे आघाडी करून ही निवडणूक लढवत आहेत. मुंबईत तिरंगी लढत पाहायला मिळत असून काही वॉर्डांमध्ये तगड्या बंडखोरांमुळे बहुरंगी लढत पाहायला मिळू शकेल. या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबईतील विविध शाखांना भेटी देण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांतील शाखांपासून त्यांनी सुरूवात केली असून यातील दोन शाखांना त्यांची भेट ही लक्षणीय अशी आहे.
नक्की वाचा: BMC Election 2026: उद्धव ठाकरेंना बंडखोरामुळे मिळाला आधार, नील सोमय्यांच्या बिनविरोध विजयाचे स्वप्न भंगले
ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्याची घेणार भेट
शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात झालेल्या जागावाटपामध्ये मुंबईतील वॉर्ड क्रमांक 107 हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला होता, मात्र या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. यामुळे या प्रभागात भाजपचे नील सोमय्या वगळता राज्यातील प्रमुख पक्षांपैकी एकाचाही उमेदवार उरला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ही जागा सुटल्याने या वॉर्डात ठाकरेंच्या शिवसेनेचे दिनेश जाधव यांनी बंडखोरी केली होती. अमित ठाकरे हे शाखाभेटीदरम्यान दिनेश जाधव यांच्याही शाखेला भेट देणार आहेत.
114 नंबरच्या शाखेला भेटही आहे महत्त्वाची
मुंबई महापालिकेतील वॉर्ड क्र. 114 तील शिवसेना(उबाठा) शाखेलाही अमित ठाकरे भेट देणार आहेत. या मतदारसंघातून खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील उभी आहे. हा वॉर्ड शिवसेना(उबाठा)ला सुटल्याने इथे मनसेच्या अनिषा माजगावकर यांनी बंडखोरी केली आहे अनिषा यांनी बंडखोरी केल्यानंतर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही अनिषा यांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्याने राजोल पाटील यांचे वडील संजय दिना पाटील हे वैतागले असल्याचे सांगण्यात येत होते. आपल्या मुलीचा पराभव करण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचा संशय संजय दिना पाटील यांना येत असल्याचे बोलले जात होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी राजोल पाटील यांच्या शाखेला भेट देणं हे महत्त्वाचे मानले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world