
दिवा रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या फास्ट लोकल ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून हा बदल दिसेल असे सांगण्यात आले आहे. दिवा स्थानकात थांबणाऱ्या फास्ट ट्रेनची संख्या वाढवण्यात यावी यासाठी काही दिवावासीयांनी आंदोलन केले होते. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले खरे मात्र यामुळे एक नवीन वाद सुरू झालाय.
मुंब्रा दुर्घटनेनंतर आंदोलन
यावर्षी जूनमध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवासी धावत्या लोकल ट्रेनमधून पडले होते. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर दिवा स्थानकाबाहेर प्रवासी संघटनेचे सदस्य उपोषणाला बसले होते. दिवा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ट्रेन सोडाव्यात, सगळ्या फास्ट ट्रेनला दिव्याला थांबा देण्यात याव्यात, पनवेल ते दिव्यादरम्यान लोकल सेवा सुरू कराली आणि दिवा तसेच मुंब्रा स्थानकाबाहेर रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली होती.
( नक्की वाचा: डोंबिवली स्टेशनमध्ये मुंगीही पाय ठेवण्यास घाबरेल इतकी गर्दी )
सप्टेंबरमध्ये नवे वेळापत्रक
आंदोलक आणि रेल्वे अधिकाऱ्यांची भेट झाली होते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी 29 जुलै आंदोलकांना सकारात्मक प्रतिसाद दिला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने आंदोलकांना सांगितले की, उपनगरीय लोकल रेल्वेचे नवीन वेळापत्रक सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि टिटवाळा येथून निघणाऱ्या जलद लोकल गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय उर्वरीत दोन मागण्यांसंदर्भातली रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दिवावासी खूश मात्र इतर प्रवासी नाराज
रेल्वे प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य करत दिव्याला अधिकच्या फास्ट ट्रेनला थांबा दिला तर त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होईल असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. कर्जत लोकल किंवा लांबून येणाऱ्या फास्ट ट्रेनला दिव्याला थांबा दिला तर ठाण्याला प्रवाशांना लोकलमध्ये चढणे मुश्कील होईल असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. दिव्याला फास्ट ट्रेन थांबल्या तर लोकलमधील गर्दी आणखी वाढेल असे प्रवाशांचे म्हणणे आहे. यापेक्षा दिव्याहून सुटणाऱ्या लोकलला प्राधान्य द्यावे असे इतर स्थानकातील प्रवाशांचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा: सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास होणार सुखकर आणि आरामदायी )
मिड-डे या वर्तमानपत्राशी बोलताना रेल्वेच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, "मुंबईती लोकल सेवेवर प्रचंड ताण आहे. सेवेमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी बराच विचार करावा लागतो. आम्ही अतिरिक्त कॉरीडॉर बांधत असून त्यामुळे नव्या सेवा वाढवणे शक्य होईल. जास्तीत जास्त गर्दी सामावून घेण्यासाठी काही तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आणखी एक थांबा सेवेमध्ये जोडणे हे विलंबासाठी कारणीभूत ठरू शकते. दिवा येथे एका जलद ट्रेनला थांबा दिला तर तिला सहा क्रॉसओव्हर पार करावे लागतील, ज्यामुळे 12 मिनिटांचा तोटा होईल आणि त्याने वेळापत्रकाचा बोजवारा उडू शकतो. "
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world