अमजद खान
गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्यासाठी विकत घेतलेली सोन्या चांदीची बॅग चोरांनी लांबवली. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या सखाराम साळुंके यांनी जेव्हा सामान ठेवण्यासाठीच्या रॅककडे नजर टाकली तेव्हा त्यांना तिथे त्यांची बॅग दिसली नाही यामुळे ते जाम हादरले होते. सीएसएमटी स्थानकातून त्यांनी गाडी पकडली होती, तेव्हापासून त्यांची नजर या बॅगेवर सातत्याने होती. मात्र ठाकुर्लीजवळ गाडी आल्यानंत जेव्हा त्यांनी बॅगेकडे नजर टाकली तेव्हा त्यांना बॅग दिसली नाही.
हे ही वाचा : कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड, अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO आला समोर
गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्यासाठी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणारे सखाराम साळुंके हे 31 ऑगस्ट रोजी झवेरी बाजारात गेले होते. सीएसएमटीवरून त्यांनी कल्याणला जाण्यासाठी लोकल पकडली होती. ठाकुर्लीला गाडी पोहोचण्यापूर्वी ती काहीकाळ थांबली होती. साळुंके यांनी सामानच्या रॅककडे नजर टाकली असता त्यांना बॅग दिसली नाही. त्यांना त्याचवेळी काहीजण लोकलमधून घाईगडबडीत उतरताना दिसले होते. साळुंके यांनी तत्काळ डोंबिवली रेल्वे स्थानक गाठून तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सीएसटी ते ठाकुर्लीदरम्यानचे सीसीटीव्ही तपासले. यामध्ये त्यांना काहीजण संशयास्पद हालचाल करताना दिसून आले होते. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चौघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : बदलापूरात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर अत्याचार, गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रीणीसह तिघांना अटक
पोलिसांनी दोन अलपवयीनांसह अल्तमस रज्जाक खान आणि शुभम संदीप ठसाळे यांना ताब्यात घेतले. या चौघांनीही गुन्हा कबूल केल्यानंतर अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर अल्तमस आणि शुभम यांना अटक करण्यात आली. हे दोघेहीजण ठाण्यातील हाजुरी गावात राहणारे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी 7 लाख 34 हजार रुपयांची सोने चांदी जप्त केली आहे. अटक केलेले आरोपी हे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे.