माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेला मृत्यूनंतर घात की अपघात अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आमदार अमोल मिटकरी, रूपाली ठोंबरे पाटील आणि सुरज चव्हाण हे सातत्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत. मात्र, त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची फळी नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
वादाचे मुख्य कारण काय?
अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून तो एक नियोजनबद्ध घातपात असू शकतो, असा संशय अमोल मिटकरी यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. विमानात आत्मघाती बॉम्बर होता का? पायलटवर 50 कोटींच्या विम्याचा प्रभाव होता का? अशा गंभीर प्रश्नांनी त्यांनी राजकीय वातावरण तापवले आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)
पक्षांतर्गत नाराजी
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या अधिकृत भूमिकेशिवाय असे विधान केल्यामुळे पक्षश्रेष्ठींची प्रतिमा मलिन होत असल्याचे मानले जात आहे. यामुळे पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन होत असल्याची चर्चा 'देवगिरी'वर रंगत आहे.
अमोल मिटकरी स्पष्टीकरण
या वादाच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून आपली बाजू स्पष्ट केली आहे. अमोल मिटकरी यांनी म्हटलं की, "माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी मी आदरणीय दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त केल्याने नाराज असल्याची पेड न्यूज़ जाणीवपूर्वक चालवल्या गेली आहे. वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा हीच मागणी केली आहे, त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या कठीण काळात एकसंघच आहे. मला हा प्रश्न का विचारलाय असा कुणी फोनकरून नाराजी व्यक्त केलेली नाही. सत्य प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही."
(नक्की वाचा- Ajit Pawar Death: पटेल, तटकरे, अरोरा... रोहित पवार नाव न घेता स्पष्टच बोलले, नव्या दाव्यांनी खळबळ)
"माझ्या नावाने पेड न्यूज पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी कोणावरही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. माझी भूमिका स्पष्ट, पारदर्शक आणि जनतेसमोर आहे. अफवा पसरवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. दादांच्या अकाली जाण्याची सत्यता जनतेसमोर आलीच पाहिजे त्यासाठी माझा लढा कायम राहील. माझा पक्ष व पक्षातील वरिष्ठ फळीतील नेते माझ्या पाठीशी राहतील याबाबत माझ्या मनात दुमत नाही", असा विश्वास देखील अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world