पुण्यातील (Pune Rain) पुलाची वाडी येथे विजेचा झटक्याने तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात अभिषेक घाणेकर, आकाश माने, शिवा परिहार या तीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुण्यात झालेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यात काल 24 जुलैपासून तुफान पाऊस सुरू आहे. येथील डेक्कन परिसरात पुलाची वाडी (Pulachi Wadi) येथे तिघांची अंडाभुर्जीचा स्टॉल होता. रात्री उशिरा अचानक पावसाचा जोर वाढल्याने ते अंडाभुर्जीच्या स्टॉलवर आवराआवर करण्यासाठी परत आले होते. स्टॉल वाचविण्यासाठी ते धडपडत होते. त्यावेळी तिथं गुडघाभर पाणी साचलं होतं. त्यातच विजेचा धक्का लागून तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला.
राज्यात पावसाचा कहर सुरू असून याचा फटका दोन जिल्ह्यांना बसतोय. मुसळधार पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात खडकवासला आणि पवना धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे मुठा नदीनं पात्र सोडलं आहे. रात्री एकाएकी पाणी आल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. गाड्या पाण्यात बुडाल्या. अनेक पुणेकरांची अख्खी रात्र पाण्यात गेली. प्रत्येकाची आपला संसार सांभाळण्यासाठी धडपड सुरू होती.
नक्की वाचा - Pune Rain : नागरिक अडकले, वाहने पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत... पुण्यात पावसाची सद्यस्थिती काय?
पुण्याच्या ताम्हणी घाटाजवळ दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक गंभीर जखमी असून शिवाजी बहिरट यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेली व्यक्ती गोंदियाची राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुण्याचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यातून पुण्याच्या पावसाची विदारक परिस्थिती लक्षात येऊ शकते.