पुण्यात पावसाची सुरु असलेली संततधार आणि खडकवासला धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम असल्याने पुण्याला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाली आहे. पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील सातत्याने सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील अनेका भागात पाणी शिरलं आहे. मात्र पुणेकरांचं टेन्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, खडकवासला परिसरात मोठा पाऊस असल्याने विसर्ग 35,000 क्युसेकवरुन 45,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच अन्य प्रशासनाशी सातत्याने सिंचन विभाग संपर्कात असून, लष्कर आणि एनडीआरएफ अलर्ट मोडवर आहे. मध्यरात्री कोणत्या अडचणी येऊ नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती नागरिकांसह सर्व यंत्रणांना देण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- नाशिकमध्ये मुसळधार; धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा)
महत्त्वाची अपडेट
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 4, 2024
पुणे: खडकवासला परिसरात मोठा पाऊस असल्याने विसर्ग 35,000 क्युसेकवरुन 45,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच अन्य प्रशासनाशी सातत्याने सिंचन विभाग संपर्कात असून, लष्कर आणि एनडीआरएफ अलर्ट मोडवर आहे. मध्यरात्री…
संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे.नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
(नक्की वाचा- Shivsena Vs BJP : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली)
पाण्याच्या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world