शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज ठाकरे हे सुनील राऊत यांच्याविरोधात सभा घेत आहेत. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्या नरेंद्र मोदी, अमित शाहांचे बूट राज ठाकरे चाटत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केलां. ठाकरे गटाचे विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील राऊत यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
राज ठाकरेंना मी स्वप्नात दिसतो- राऊत
राज ठाकरे विक्रोळीत दोन वेळा येऊन गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज ठाकरे येथे आले. लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रात अनेक प्रश्न असताना राज ठाकरे बोलले कशावर बोलले तर माझ्यावर. राज ठाकरे यांना मी स्वप्नात दिसतो. नरेंद्र मोदींना, अमित शाहांना स्वप्नात संजय राऊत दिसतात. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावाने झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे, असं संजय राऊत म्हणाले.
(नक्की वाचा- रितेश भाऊविरोधात साऊथ सुपरस्टार मैदानात; देशमुखांच्या गडात पवन कल्याणचा झंझावात)
महाराष्ट्राच्या दुश्मनांचे बुट चाटू नका- राऊत
राज ठाकरे म्हणाले, इथे एक भिकारडा संपादक राहतो. राज ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देतांना संजय राऊत यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र भिकारी केला आहे. त्या मोदींचे आपण पाय चाटत आहात. बाळासाहेब ठाकरे यांनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणताय, हे तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम. तुमची पोटदुखी, मळमळ आहे ती तुम्ही बाहेर काढली. तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. महाराष्ट्राच्या दुश्मनांचे बुट चाटू नका, अशी माझी नम्र विनंती आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- फडणवीस, गिरीश महाजन, बावनकुळे, विखे पाटील यांसारखे बडे नेते अडचणीत; रोहित पवारांचा मोठा दावा)
23 तारखेला तुमची खाट टाकणार
राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली. मग मी ठरवलं आपण त्यांच्यासाठी खाट ठेऊया. कारण 23 तारखेला आपण त्यांची खाट टाकणारचं आहोत. आम्ही बाळासाहेबांची कडवट निष्ठावंत आहे. आम्ही आमची निष्ठा, इमान विकलं नाही. आम्हीला ईडी घेऊन गेली म्हणून घाबरलो नाही. तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं दोन वर्ष कोमात गेलात, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world