जाहिरात

IPL 2025 Auction : हुकुमाचा एक्का RCB ने सोडला, मुंबई इंडियन्सने डाव साधला; नेमकं घडलं काय?

विल जॅक्स हा मागच्या हंगामात RCB संघाकडून खेळत होता. आश्वासक कामगिरी केल्यानंतरही RCB ने विल जॅक्ससाठी एका क्षमतेबाहेर बोली न लावता माघार घेण्याचा निर्णय घेतला.

IPL 2025 Auction : हुकुमाचा एक्का RCB ने सोडला, मुंबई इंडियन्सने डाव साधला; नेमकं घडलं काय?
मुंबई:

सौदी अरेबियेच्या जेद्दाह येथे सुरु असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने आणखी एक चांगला मासा गळाला लावला आहे. पहिल्या दिवशी ट्रेंट बोल्टला खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या लिलावात मुंबईने रायन रेकल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर यांना आपल्या ताब्यात घेतलं. अखेरच्या टप्प्यात इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्ससाठी मुंबईने आपले सर्व पत्ते खुले करत 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजत त्याला आपल्या संघात घेतलं आहे.

महत्वाची बाब म्हणजे विल जॅक्स हा मागच्या हंगामात RCB संघाकडून खेळत होता. आश्वासक कामगिरी केल्यानंतरही RCB ने विल जॅक्ससाठी एका क्षमतेबाहेर बोली न लावता माघार घेण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा - IPL 2025 Auction : वयवर्ष 18, 4.80 कोटींची बोली...कोण आहे MI ने खरेदी केलेला अल्लाह गझनफर?

दोन संघ होते शर्यतीत -

विल जॅक्सचं नाव लिलावासाठी आल्यानंतर पंजाब आणि मुंबई या दोन संघांमध्ये थेट लढत सुरु झाली. दोघांच्याही द्वंद्वामध्ये विल जॅक्सच्या बोलीने 5 कोटींचा टप्पा गाठला. परंतू मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने हार न मानता 5.25 कोटींची बोली लावली आणि पंजाबने माघार घेतली.

यादरम्यान RCB कडे RTM कार्डाद्वारे विल जॅक्सला आपल्या संघात घ्यायचा पर्याय होता. परंतु त्यांनी हा पर्याय न वापरल्यामुळे विल जॅक्स मुंबईच्या संघात दाखल झाला आहे. या बोलीवर मोहोर उमटल्यानंतर मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी RCB च्या गोटात जाऊन शेकहँड करत त्यांचे आभार मानले

मागच्या हंगामात RCB कडून विल जॅक्सची बॅट तळपली होती -

IPL 2024 च्या हंगामात विल जॅक्स RCB कडून 8 सामने खेळला होता. ज्यात त्याने 230 रन्स केल्या होत्या ज्यात एका शतकाचा समावेश होता. आयपीएलमध्ये विल जॅक्सने 175.5 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. त्यामुळे इतक्या महत्वाच्या खेळाडूला RCB ने हातचं का जाऊ दिलं याबद्दल सध्या शंका व्यक्त केली जात आहे.

विल जॅक्सची आकडेवारी काय सांगते?

आतापर्यंत विल जॅक्सने इंग्लंडकडून 2 कसोटी, 15 वन-डे आणि 23 टी-२० सामने खेळले आहेत. याव्यतिरीक्त प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही विल जॅक्सची कामगिरी ही उल्लेखनीय राहिली आहे. त्यामुळे नवीन हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना विल जॅक्सची बॅट तळपते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा - IPL 2025 Auction : मुंबईला मिळाला नवा विकेटकिपर, 1 कोटींच्या बोलीवर घेतलेला रिकल्टन आहे तरी कोण?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com