Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये एका भामट्याने रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याचे सांगून चक्क रेल्वे कर्मचाऱ्यालाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वेच्या सतर्क दक्षता पथकाने रचलेल्या जाळ्यात हा तोतया अधिकारी अलगद अडकला. सरकारी कामातील थकीत देयके मंजूर करून देण्याच्या नावाखाली लाच घेणाऱ्या या तोतया इन्स्पेक्टरचा पर्दाफाश झाल्याने रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
हर्षिश कांबळे नावाच्या या व्यक्तीने आपण डीआरएम कार्यालय मुंबई येथील रेल्वे बोर्डाचे दक्षता निरीक्षक (व्हिजिलन्स इन्स्पेक्टर) असल्याची बतावणी केली होती. रेल्वेतील एका बुकिंग क्लार्कचे काही पैसे डीआरएम कार्यालयात अडकले होते.
ही थकीत रक्कम मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून हर्षिशने त्या कर्मचाऱ्याकडे 60,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. रेल्वे कर्मचाऱ्याला या प्रकाराचा संशय आल्याने त्याने तातडीने रेल्वेच्या दक्षता विभागाकडे याची तोंडी तक्रार केली.
(नक्की वाचा : BJP MLA : 19 वर्षांची लेक आजारी आणि भाजपा आमदाराने केलं दुसरं लग्न ! पहिल्या पत्नीच्या गंभीर आरोपामुळे खळबळ )
कशी झाली कारवाई?
रेल्वे कर्मचाऱ्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने 22 जानेवारी 2026 रोजी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20,000 रुपये स्वीकारण्यासाठी हर्षिशला कल्याण रेल्वे स्थानकात बोलावण्यात आले.
दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजवर (FOB) जेव्हा हर्षिश हा पैसे घेण्यासाठी आला, तेव्हा दबा धरून बसलेल्या दक्षता पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. स्वतःला अधिकारी म्हणवून घेणाऱ्या या भामट्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आला.
रंगेहाथ पकडल्यानंतर दक्षता पथकाने तातडीने हालचाली करत दुपारी 2.45 वाजता हर्षिश कांबळेला जीआरपी कल्याण पोलिसांच्या स्वाधीन केले. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Nashik News: सून किंचाळत होती अन् सासरा काठीने मारत होता; पोटच्या मुलाने शूट केला सर्व प्रकार, पाहा VIDEO )
त्याने या प्रकारे आणखी कोणाला फसवले आहे का किंवा या मागे मोठी टोळी सक्रिय आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना अशा कोणत्याही तोतया व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world