
राहुल कुलकर्णी, पुणे: अल्पवयीन मुलाला धमकावत घरफोडी केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. येरवडा परिसरात अल्पवयीन मुलाला जिवे मारण्याची भीती दाखवून घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नोव्हेंबर 2024 पासून 23 मार्च 2025 या कालावधीत आरोपींनी संगनमताने त्यांच्या 15 वर्षीय मुलाला लक्ष्य केले. घरातील दागिने व रोख रक्कम चोरण्यास प्रवृत्त केले. आरोपींनी त्याला तसेच कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत घरातील 84 तोळे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे 25.20 लाख रुपये) आणि 15 ते 20 हजार रुपयांची रोख रक्कम सोपविण्यास भाग पाडले.
दरम्यान, या प्रकरणी रोहित नवनाथ ओव्हाळ (वय 29, रा. जाधवनगर, येरवडा), रेहान शब्बीर कुरेशी (वय 25, रा. हुसेन शहा बाबा दर्ग्याजवळ, येरवडा) आणि स्टिफन जॉन शिरसाट (वय 19, रा. सोमनाथनगर, वडगावशेरी) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे पुणे शहरातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात 2 लाख रुपयांचा 13 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पुण्यातील येरवडा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. जगदीश भवानसिंग बारेला आणि पवन सुभाष बारेला अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात काही व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. त्यांच्याकडून २ लाख ८१ हजार रुपयांचा १३ किलो गांजा जप्त करण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world