लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निकालात सर्वात जास्त फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना बसला आहे. त्यांच्या पदरात केवळ एकच जागा मिळाली. त्यांना पत्नी सुनेत्रा पवार यांनाही निवडून आणता आले नाही. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानसभा निवडणुका आता काही महिन्यावर आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या गटात असलेले आमदार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे त्यातील अनेक आमदार पुन्हा शरद पवारांच्या गटात येण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात आहे. त्यातले किती आमदार शरद पवारांकडे येणार आणि किती भाजपमध्ये जाणार याचा आकडाच रोहित पवार यांनी सांगितला आहे.
हेही वाचा - अजित पवारांना काय सल्ला देणार? बारामती जिंकताच सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
रोहित पवारांचा दावा काय?
लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाचा दारून पराभव झाला. आधी पदरात फक्त चार जागा पडल्या. त्याबाबत पक्षात नाराजी होती. त्यात आता चार पैकी एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. महत्वाचे म्हणजे बारामतीच्या होम पिचवर अजित पवारांना शरद पवारांनी मोठा दणका दिला. यानंतर आपलेही विधानसभेला काही खरे नाही अशी भावना अजित पवारांच्या गटातील आमदारांची झाली आहे. त्यामुळे जवळपास 18 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या पैकी कोणाला पक्षात घ्यायचे याचा निर्णय हे शरद पवार घेतली असेही ते म्हणाले. दरम्यान अजित पवार गटाचे जवळपास 12 आमदार हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - वंचितचा आघाडीला दणका, जिंकता-जिंकता चार जागा हरल्या
अजितदादा गटाची प्रतिक्रीया काय?
रोहित पवारांचा हा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी फेटाळून लावला आहे. काही लोक अफवा पसरवत आहे. निवडणुकीच्या काळातही असेच केले गेले. खोटे व्हीडिओ व्हायरल केले गेले होते. अजित पवारांबरोबर सर्व आमदार आजही आहेत. हे सर्व आमदार गुरूवारी होणाऱ्या बैठकीला हजर राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असेही ते म्हणाले. सर्व आमदार हे एकसंध आहेत असेही ते म्हणाले. दरम्यान या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा मतदार संघा नुसार आढावा घेतला जाणार आहे असेही ते म्हणाले.
हेही वाचा - बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?
विधानसभे नव्या चेहऱ्यांना संधी
एकीकडे अजित पवारांचे आमदार संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गट करत आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत तरूणांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. शिवाय महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणायचे आहेत असेही ते म्हणाले.
बारामतीने काकीला नाकारले
रोहित पवार यांनी बारामतीत झालेल्या विजया बाबतही वक्तव्य केले. काकीला बारामतीच्या लोकांनी नाकारले आहे असेही ते म्हणाले. बारामती नेहमीच शाहू फुले आंबेडकर विचारांचा राहीला आहे. त्यांनी भाजपच्या विचारांना नाकारले आहे. प्रत्येक ठिकाणी महापुरूषांच्या विचारांचा अवमान भाजपकडून होत आहे. त्याचा बदला महाराष्ट्राने घेतल्याचेही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world