जाहिरात

Akola News अकोला महापालिकेत चाललंय काय? भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रस्तावांचा खेळ, सत्तेची खुर्ची कुणाकडे

Akola Municipal Corporation 2026: अकोला महापालिकेत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

Akola News अकोला महापालिकेत चाललंय काय? भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रस्तावांचा खेळ, सत्तेची खुर्ची कुणाकडे
Akola Municipal Corporation 2026: उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपा यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची चर्चा शहरात वारंवार होत आहे. 
अकोला:

योगेश, शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Municipal Corporation 2026: अकोला महापालिकेत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मात्र, या प्रक्रियेत राजकीय नाट्य चांगलेच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपा यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची चर्चा शहरात वारंवार होत आहे. 

या दोन्ही पक्षांकडून आता परस्परविरोधी दावे करण्यात येत असल्याने अकोल्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उबाठा गटाने विकासाच्या मुद्द्यावर भाजपला प्रस्ताव दिल्याचे म्हटले आहे, तर भाजपने मात्र उबाठा गटाने उपमहापौर पदाची मागणी केल्याचा दावा करत हा प्रस्ताव फेटाळला असल्याचे सांगितले आहे.

उबाठा गटाच्या अटी आणि आमदार नितीन देशमुखांचे स्पष्टीकरण

अकोल्यात उबाठा गटाला भाजपकडून फोन आल्याच्या चर्चेला आमदार नितीन देशमुख यांनी एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले आहे. देशमुख यांनी स्पष्ट केले की, उबाठा गटाने सत्ता स्थापनेसाठी भाजपसमोर काही नागरी सुविधांचे प्रस्ताव मांडले होते. 

( नक्की वाचा : Akola News:अकोला सस्पेन्स वाढला ! भाजपाची कोंडी, 'नॉट रिचेबल' चा खेळ आणि महापौरपदासाठी 3 नावांची जोरदार चर्चा )

 शहराच्या विकासाचे आणि नागरी सुविधांचे हे मुद्दे मान्य होत असतील, तरच भाजपसोबत जाण्याचा विचार केला जाईल. जो कोणी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असेल, त्याला आम्ही साथ देऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच उबाठा गटाचे सर्व नगरसेवक एकनिष्ठ असून कोणीही भाजपच्या थेट संपर्कात नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

भाजपचा दावा आणि उपमहापौर पदाची चर्चा

दुसरीकडे, भाजपचे अकोला महानगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक विजय अग्रवाल यांनी वेगळाच दावा केला आहे. उबाठा गटाच्या जिल्हा प्रमुखांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले असले, तरी ही चर्चा नागरी सुविधांवर नाही तर केवळ पदांवर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

उबाठा गटाने भाजपसमोर उपमहापौर पदाची मागणी केली होती, जी भाजपने फेटाळून लावली आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. नागरी सुविधांची कामे भाजपचे खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून आधीच सुरू असल्याचे सांगत त्यांनी उबाठा गटाचे दावे खोडून काढले आहेत.

( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'कैसा हराया'! जितेंद्र आव्हाडांच्या हातातून मुंब्रा निसटतंय? वाचा का सुरु झालीय चर्चा )
 

महापालिकेतील पक्षीय बलाबल आणि जादुई आकडा

अकोला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठणे हे सर्वच पक्षांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. सध्याचे संख्याबळ खालीलप्रमाणे आहे:

भाजप – 38
काँग्रेस - 21
उबाठा – 6
वंचित बहुजन आघाडी – 5
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 3
एमआयएम – 3
अपक्ष – 2
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 1
शिंदे गट – 1

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 41 या जादुई आकड्यापासून ते अजूनही 3 जागा दूर आहेत. याच 3 जागांच्या गणितामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांचे महत्त्व वाढले आहे.

काँग्रेसचे 'मिशन भाजपला रोखा'

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता काँग्रेसने निर्णायक पाऊल उचलले आहे. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसला सत्तेत कोणतेही पद नको, मात्र भाजपला रोखणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांची भेट घेतली असून, पुढील रणनीतीसाठी ते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहेत. सर्व पक्ष एकत्र आल्यास अकोल्यात नवे सत्तासमीकरण पाहायला मिळू शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com