गुरूप्रसाद दळवी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातलं वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. कोकणातील सिंधुदुर्गात राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे असा संघर्ष होणार आहे. राणेंचे एकेकाळचे सहकारी राजन तेली आणि परशुराम उपरकर यांनी राणेंची साथ सोडली आहे. ते सध्या ठाकरे गटात आहे. सावंतवाडीतून राजन तेली विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर उपकरांनी तेलींना साथ देण्याचे ठरवले आहे. या दोघांनी ही नारायण राणेंसह त्यांच्या दोन्ही मुलांवर हल्लाबोल करत राणे काय आहेत हेच जाहीर पणे सांगितले होते. त्यानंतर नारायण राणे हे आक्रमक होत त्यांनी तेली आणि उपरकर यांच्यासाठी आपण काय काय केलं? त्यांची स्थिती आधी काय होती हेच सांगून टाकले. त्यामुळे वातावरण आणखी तापणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुडाळ मालवणी विधानसभा मतदार संघातून निलेश राणे, कणकवलीतून नितेश राणे मैदानात आहेत. दोघे सख्खे भाऊ पण वेगवेगळ्या पक्षातून ते उमेदवार आहेत. यावरून राणेंच्या विरोधकांनी त्यांना घेरले आहे. सावंतवाडी विधानसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली यांनी राणेंवर सर्वात आधी हल्ला चढवला. राणे यांनी आपल्याला वाईट वागणूक दिली. त्यांची मुलेही आपल्या बरोबर चुकीची वागली. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच आपण राणेंची साथ सोडली असा आरोप तेली यांनी केला होता. राणे हे त्यांचे आणि त्यांच्या मुलांसाठी बघत असतात. त्यांना कार्यकर्त्यांचे काही घेणे देणे नाही. ते सिंधुदुर्गात सर्वात आधी आले त्यावेळी त्यांना आपण सर्व काही दाखवलं होतं असे तेली म्हणाले होते.
ट्रेंडिंग बातमी - नितेश राणेंना त्यांच्या गडात आव्हान देणारे संदेश पारकर कोण?
राजन तेली यांच्या प्रमाणे परशुराम उपरकर हेही एकेकाळी राणेंचे कट्टर समर्थक होते. त्यांनीही राणेंची साथ सोडली. आता ते ठाकरे गटात आहेत. राणे हे घर दिल्याचे सांगतात. मात्र माझ्या घरी ते आले होते. ज्या ताटात त्यांनी खाल्लं त्यात त्यांनी छेद केला. जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत ते तुमचे आमचे कसे होवू शकतात. मुख्यमंत्री होते, उद्योगमंत्री होते पण त्यांनी जिल्ह्यासाठी काही केले नाही. त्यांनी कधी आपल्या भावांना राजकारणात आणलं नाही. कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्या नाहीत. दोन मुलांसाठी त्यांचे सर्व काही सुरू आहे. पुढे त्यांच्या नातवांचे झेंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना हातात घ्यावे लागतील. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि ठाकरेंच्या मुळे शिवसेनेत कार्यकर्त्यांनी परत यावं असं आवाहन करत राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.
तेली आणि उपरकरांच्या आरोपानंतर नारायण राणे यांनीही या दोघांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तेली -उपरकर काय काम करतात? त्यांचे धंदे काय आहेत? त्यांच्याकडे पैसे कुठून येतात? असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. राणे सावंतवाडीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी तेलांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. राजन तेली दुकानात पुड्या बांधायचे. स्वत:चे राहाण्यासाठी घर नव्हते. त्यावेळी ते मामाच्या घरात राहात होते. त्यावेळी त्यांनी मी पदं दिली. जिल्हाध्यक्ष केले. पुढे जिल्हा बँकेचे अध्यक्ष केले. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नव्हते त्यावेळी आमदारांची जुळवाजुळव करून तेलींनी मीच आमदार केले होते असा दावा राणे यांनी केला. तेली आज जे काही आहेत ते आपल्यामुळेच आहेत असेही राणे यावेळी म्हणाले.
राणेंनी यावेळी परशुराम उपरकर यांच्यावरही टिकेची झोड उठवली. उपरकरांच्या घरी गेली होतो. त्यावेळी त्यांचं धड घरही नव्हतं. त्यावेळी त्यांना पहिले घर बांध असे सांगितले होते. ते घर बांधण्यासाठी पैसेही मीच दिली होते. त्यानंतर उपरकरांना घर बांधता आले. त्यांचे आताचे जे घर आहे ते आपल्यामुळेच आहे असेही त्यांनी सांगितले. कोकणात निवडणूक आता ऐन रंगात आली आहे. त्यामुळे आरोप आणि प्रत्यारोप वाढत जाणार आहे. त्याची झलक आता कोकणातील मतदारांना पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world