लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार आज ( बुधवार ) संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पुर्व विदर्भातल्या 5 लोकसभआ मतदार संघाचा समावेश होतो. या पाच मतदार संघात आज संध्याकाळी सहानंतर प्रचार थांबणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विकास ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, हे प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस नेते राहुल गांधींच्याही सभा विदर्भात झाल्या आहेत. संध्याकाळी प्रचार थांबल्यानंतर घरोघरी जावून प्रचार करण्यावर उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा जोर असेल.
कोणत्या मतदार संघात प्रचार थंडावणार?
विदर्भातल्या पाच लोकसभा मतदार संघात आज प्रचार थंडावणार आहे. त्यात नागपूर, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा गोंदीया या मतदार संघांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्याची अधिसुचना 20 मार्चला निघाली होती. तर 27 मार्च पर्यंत अर्ज दाखल करायचे होते. 30 मार्च पर्यंत अर्ज मागे घ्यायचे होते. त्यानंतर सर्व उमेदवार जोरदार प्रचारात व्यस्त झाले होते. पुर्व विदर्भातल्या उमेदवारांना तुलनेने प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. त्यात उन्हाचा कडाका असल्याने त्याचाही सामना करावा लागला. आता या मतदार संघात 19 एप्रिलला मतदान होणार आहे.
हेही वाचा - नागपूर 'गड'करी राखणार की काँग्रेस गडाला तडा देणार?
प्रमुख नेत्यांच्या झाल्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुर्व विदर्भात प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. त्या शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रचाराची राळ भाजपकडून उठवली होती. तर महाविकास आघाडीकडून विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यांनी धुरा सांभाळली होती.
हेही वाचा - काँग्रेसच्या ताब्यातील चंद्रपूर पुन्हा जिंकण्यासाठी भाजपासमोर 3 मोठी आव्हानं
लक्षवेधी लढती कुठे?
पहिल्या टप्प्यात होत काही मतदार संघात लक्षवेधी लढती होत आहेत. त्यात नागपूर लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी तगडं आव्हान उभं केलं आहे. तर चंद्रपूर लोकसभेतही मंत्री सुधीर मुनगंटीवांरांना प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान असेल. या दोन्ही ठिकाणी काटे की टक्कर होताना पाहायला मिळत आहे. शिवाय रामटेक, गडचिरोली आणि भंडारा गोंदीयात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र या ठिकाणी बसपा आणि वंचितचेही उमेदवार मैदानात असल्याने ते कोणाचे गणित बिघडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world