भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर अनेक मतदार संघात नाराजी नाट्य सुरू झाले आहे. शिवाय अनेकांनी राजीनामेही दिले आहेत. तर काही जण बंडखोरीच्या तयारीत आहेत. तसाच काही प्रकार नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा मतदार संघात होत आहे. या मतदार संघात सध्या भाऊबंधकी उफाळू आली आहे. इथे भाजपने विद्यमान आमदार राहुल आहेर यांना पुन्हा संधी दिली आहे. विशेष म्हणजे राहुल आहेर यांनी आपल्या ऐवजी आपले बंधू आणि नाफेडचे संचालक केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी असे सांगितले होते. प्रत्यक्षात तसे न होता राहुल आहेर यांनचा उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर केदा आहेर यांचे समर्थक नाराज झाले आहे. त्यासाठी भाजपच्या जवळपास 15 नगरसेवकांनी राजीनामेही दिले आहेत. शिवाय राहुल आहेर यांच्या विरोधात सोशल मीडियावर जोरदार टिका ही केली जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली असतानाही घोषणा केली होती. त्यामुळे केदा आहेर यांना भाजपची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे केसाने कापला दादाचा गळा अशा आशयाच्या संतप्त पोस्ट करत केदा आहेर समर्थकांकडून सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केला जात आहेत. फडणवीसांपासून भाजपच्या वरिष्ठांसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. तरी देखील आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप केदा आहेर यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावाही घेतला. ते अपक्ष लढण्याची ही चर्चा मतदार संघात आहे. तसे झाल्यास भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो. दरम्यान राहुल आहेर यांनी माघार घेऊन निर्णय घ्यावा असे केदा आहेर यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - वारे वा निवडणूक ! 2 दिवसात 4 पक्षात प्रवेश करणारा उपसरपंच, त्यांनी असं का केलं?
गेल्या 30 वर्षापासून आपण राजकारणात आहोत. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत राहुल आहेर यांच्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो नव्हतो असे ते म्हणाले. त्यावेळी वरिष्ठां बरोबर ही चर्चा झाली होती. शिवाय पुढच्या वेळी उमेदवारीचा शब्द ही देण्यात आला होता. मात्र तसे झाले नाही असे केदा आहेर म्हणाले. जनता जे म्हणेल ते करणार असं ही त्यांनी सांगितलं. सध्या कार्यकर्त्यांच्या भावना तिव्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपल्याला उमेदवारी मिळणे गरजेचे होते. आता भावाने निर्णय घेतला पाहीजे. आपण त्यांना विनंती करत आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. केदा आहेर यांच्या समर्थकांनी आता समाज माध्यमांवर पोस्टर वार सुरू केले आहे."दाखवूनी भोळ्या भावाला त्यागाचा लळा, शेवटी केसानेच कापला दादा भावाचा गळा..." अशा पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. त्याच बरोबर "राजकीय लोभापोटी कुठून आली हिम्मत, स्वर्गीय बाबांच्या शब्दांची सुद्धा नाही किंमत." ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे निवडणुकी आधी पोस्टर वॉर या मतदार संघात दोन भावांमध्ये रंगले आहे.
विद्यमान आमदार डॉ.राहुल आहेर यांना माजी मंत्री डॉक्टर दौलतराव अहेर यांच्या शब्दांची आठवण या पोस्टच्या माध्यमातून करून देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेत चुलत बंधू केदा आहेर यांच्या नावाची पक्ष श्रेष्ठींकडे शिफारस केली होती.मात्र भाजपने डॉ.आहेर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे केदा आहेर समर्थकांमध्ये विश्वास घात झाल्याची भावना आहे.आता चांदवडमध्ये दादा विरुद्ध नाना अशी लढत रंगणार आहे. मतदार कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world