विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरु होण्यास काही तास उरले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रचार आता समाप्त झालाय. राज्यात यंदा तब्बल सहा प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. त्याचबरोबर अन्य छोटे पक्ष तसंच बंडखोरही रिंगणात असल्यानं सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. मतदानाला काही तास शिल्लक असतानाच काँग्रेसच्या चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मतदारांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
काय म्हणाल्या धानोरकर?
काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठिमागे राहिला तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार, असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला. वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगढी यांची प्रचारसभा सोमवारी झाली. या सभेत बोलताना धानोरकर यांनी हा इशारा दिलाय.
( नक्की वाचा : 'हे फक्त रजनीकांतच्या सिनेमात होतं', फडणवीसांनी सांगितली देशमुखांच्या हल्ल्याची स्क्रिप्ट )
खासदार धानोरकर म्हणाल्या, ‘आज जे लोक माझा विरोध करीत आहेत. माझ्या विरोधात बोलत आहेत. आत्ता मी कुणाला काहीही बोलणार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात 2800 गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता. कोण विरोधात होता. प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे. ही तर एक विधानसभा आहे. फक्त 300 गावांची आहे. या विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता याचा चिठ्ठा काढण्यास फार वेळ लागणार नाही. 20 नोव्हेंबरला मतदान झाले की गावनिहाय यादी माझ्याकडे येईल. कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी या ठिकाणी करून आहे, असा दमही त्यांनी दिला.
काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांची विरोधात जाणाऱ्यांना उघड धमकी | NDTV Marathi#ParatibhaDhanorkar #VidhanSabhaElection2024 #NDTVMarathi pic.twitter.com/iWyEZySJ4f
— NDTV Marathi (@NDTVMarathi) November 19, 2024
धानोरकर कुटुंबात फूट!
वरोरा विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अनिल यांना काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित होती. पण, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी जोर लावला. यावरून धानोरकर कुटुंबात फूट पडल्याचीही चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world