लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खालेल्या महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. बहुतेक एक्झिट पोलमध्ये महायुती जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात महायुतीनं सर्व एक्झिट पोलनं व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं राज्यात 100 पेक्षा जास्त जागा मिळवल्यात. त्याचबरोबर 2019 पेक्षा स्ट्राईक रेटही सुधारला आहे.
महायुती आणि विशेषत: भाजपानं राज्यात मिळवलेल्या यशात राष्ट्रीय स्वयंसेक संघ (RSS) आणि संघ परिवारातील संघटनांचं मोठं योगदान आहे. लोकसभा निवडणुकीत 'स्वस्थ' असलेले संघ कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत 'दक्ष' राहून प्रचार केला. या प्रचाराचं फळ भाजपा आणि महायुतीला मिळालं आहे.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय? )
संघाला प्रचार करण्याची गरज का निर्माण झाली?
देशात कार्यकर्त्यांचं सर्वाधिक केडर असलेला पक्ष अशी भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. भाजपाच्या सक्रीय कार्यकर्त्यांससह संघ स्वयंसेवकाची त्यांना निवडणुकीत साथ मिळत असते. लोकसभा निवडणुकीत संघ कार्यकर्ते सक्रीय नव्हते. त्याचा फटका निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात बसला असं मानलं जातं. लोकसभा निवडणुकीतील या पराभवानंतरच संघ परिवारानं मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानं या विषयावर 'NDTV मराठी' ला बोलताना सांगितलं की, 'विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवणे हा संघाच्या कामाचा मुख्य उद्देश होता. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या निर्धारानं स्वयंसेवक मैदानात उतरले.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? )
कसा केला प्रचार?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांच्या रचनेतील प्रांत, विभाग, जिल्हा, तालुका, शहर आणि शाखा या सर्व माध्यमातून या कामाचं नियोजन केलं. या सर्व पातळीवरील स्वयंसेवकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरोघरी जाऊन जास्तीत जास्त संख्येनं देशहितासाठी मतदान करा, हे आवाहन केलं.
'संघ स्वयंसेवकांनी प्रचार करताना कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला मतदान करा,' असं स्पष्ट शब्दात सांगितलं नाही. पण, देशहितासाठी मतदान करा, असं आवाहन केलं. लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावं मतदार यादीतून वगळली होती. त्यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर नवीन मतदारांनाही यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शन केलं, अशी माहिती संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानं 'NDTV मराठी' शी बोलताना सांगितली.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result : शिवसेना शिंदेंचीच, महाराष्ट्राचा फैसला! बालेकिल्ल्यात ठाकरेंना धक्का )
मतदानाच्या दिवशी काय केलं?
निवडणुकीच्या मतदानाचा दिवस हा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा असतो. त्या दिवशी जो पक्ष आपल्या मतदारांना जास्तीत जास्त संख्येनं मतदान केंद्रापर्यंत घेऊन येतो, त्याच्या विजयाची शक्यता अधिक असते. संघ स्वयंसेवक मतदानाच्या दिवशी देखील सक्रीय होते.
आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष ग्राऊंडवरील काम याची सांगड घालत प्रत्येक बूथचं नियोजन केलं होतं. आपआपल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त मतदान होईल त्यासाठी स्वयंसेवकांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत केली. संघाच्या प्रचारामुळे अनेक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली. विशेषत: भाजपाला पारंपारिक पद्धतीनं मतदान करणाऱ्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं.
संघ स्वयंसेवकांच्या प्रयत्नामुळे भाजपाच्या पारंपारिक मतदारांच्या मतदानात सुमारे 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली, अशी माहिती संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिली. या वाढलेल्या मतांमुळेच भाजपा आणि महायुतीला राज्यात मोठा विजय मिळाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world