जाहिरात
This Article is From Jun 02, 2024

अरूणाचल प्रदेशातून अजित पवारांसाठी आनंदवार्ता, विधानसभा निवडणुकीत काय झालं?

लोकसभा निवडणुकी बरोबरच अरूणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या होत्या. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका दिसून आला आहे.

अरूणाचल प्रदेशातून अजित पवारांसाठी आनंदवार्ता, विधानसभा निवडणुकीत काय झालं?
मुंबई:

लोकसभा निवडणुका पार पडल्या आहे. एक्सिट पोलही जाहीर झाले आहेत. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी तेवढेसे दिलासादायक चित्र दिसून आलेले नाही. मात्र अरूणाचल प्रदेशातून अजित पवारांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लोकसभा  निवडणुकी बरोबरच अरूणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या होत्या. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका दिसून आला आहे. विशेष म्हणजे इथे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची फळे देखील चाखण्याची संधी आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

अरूणाचल प्रदेश विधानसभेच्या 50 जागांची मतमोजणीला आज ( रविवारी) सकाळी सुरूवात झाली आहे. 60 जागांच्या विधानसभेत 10 जागा या याआधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 50 जागांवर मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता स्थापनेच्या दिशेने कुच केली आहे. भाजपने 42 जागा जिंकल्या असून 4 जागांवर आघाडीवर आहेत. एकीकडे भाजपच्या सत्ता स्थापनेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीचीही चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही या निवडणुकीत आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. 

हेही वाचा -  निवडणूक निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये मोठे फेरबदल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिन उमेदवार हे अरूणाचल प्रदेशात आघाडीवर आहेत. त्यातील एका उमेदवाराने आपला विजय नोंदवला आहे. याचोली विधानसभा मतदार संघातून टोको तातुंग यांनी 228 मतांनी विजय नोंदवला आहे. तर लेकांग मतदार संघातून लिहा सोनी हे आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित समजला जात आहे. त्यात बरोबर बोर्डुमसा-दियुं मतदार संघातून निख कामीं हेही आघाडीवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात तिन जागा जाण्याची दाट शक्यता आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली लढलेली ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे राज्याबाहेर मिळालेले हे यश नक्कीच ताकद देणारे ठरणार आहे. 

हेही वाचा - 12 वी पास झाल्याचा आनंद, फिरण्यासाठी 'ती' उत्तर भारतात गेली, घात झाला

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे. अरूणाचल प्रदेशात भाजप सरकार बनवणार हे जवळपास निश्चित आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत सहभागी होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे महाराष्ट्रा बाहेरही आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची फळे चाखण्याची संधी चालून आली आहे.