जाहिरात
This Article is From Mar 09, 2024

Lok Sabha Election 2024: भाजप-बीजेडीचं घोडं अडलं, ओडिशात BJP स्वबळावर

Lok Sabha Election 2024: भाजप-बीजेडीचं घोडं अडलं, ओडिशात BJP स्वबळावर
दिल्ली:

ओडिशात (Odisha Loksabha Election 24) भाजपा आणि बीजेडीत युती होणारच असे स्पष्ट संकेत मिळत असताना अचानक दोन्ही पक्षातली चर्चा थांबवण्यात आली आहे. युती करण्यासाठी दोन्ही पक्ष अनुकूल आहेत पण जागा वाटपावर घोडं अडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातही भाजपला (BJP) राजधानी भूवनेश्वर आणि पुरी अशा लोकसभेच्या दोन जागा हव्याच आहेत, त्या द्यायला नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांचा बीजू जनता दल (BJD) तयार नाही. ओडिशाचे भाजपच्या कोअर टीममधले नेते तीन दिवसांपासून राजधानी दिल्लीत होते. चर्चेची दारं बंद झाली असून भाजपचे नेते ओडिशाला परतले आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ओडिशात भाजप पुन्हा स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश भाजपच्या शिर्ष नेतृत्वानं दिले आहेत. 

दिल्लीत नेमकं काय घडलं?

ओडिशा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. सामल स्वत: भाजपानं बीजेडीसोबत युती न करता स्वतंत्र लढावं ह्या भूमिकेचे आहेत. पण एनडीएचा कुणबा वाढवण्याचा प्रयत्न केंद्रीय नेतृत्वाचा आहे. त्यामुळे बीजेडीसोबत युती करण्यावर प्राथमिक सहमती झाली आणि दोन्ही पक्षात जागा वाटपाची चर्चाही सुरु झाली. ओडिशात विधानसभेच्या 147 जागा आहेत तर लोकसभेच्या 21. भाजपला अब की बार चारसों पार वास्तवात उतरवायचं असेल तर नवीन पटनायकसारख्या नेत्यांची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात चर्चा झाली पण दोन प्रमुख जागा पुरी आणि भुवनेश्वरवरुन चर्चा जवळपास थांबलेली आहे. प्रदेशाध्यक्ष सामल हे भुवनेश्वरला परतलेले आहेत. ते म्हणाले की, सध्या तरी राज्यात कुणासोबतच युतीची कुठलीच चर्चा नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढू. आगामी लोकसभा तसच विधानसभेच्या तयारीसाठी आम्ही दिल्लीत होतोत. जागा वाटपाबाबत कोणत्याच पक्षासोबत कुठलीच चर्चा झालेली नाही. भाजपा दोन्ही निवडणूका स्वबळावर लढवेल.

भाजपा-बीजेडीचं नेमकं कुठं फिस्कटलं?

भाजपा आणि बीजेडीमध्ये निवडणूकपुर्व युती करण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर जागा वाटपाची चर्चा अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली नाही. नवीन पटनायक यांच्या बीजेडीनं विधानसभेच्या 147 जागांपैकी 100 जागा लढण्याची मागणी केली. भाजपला ती मागणी पटली नाही. बीजेडीची भूमिका पहाता मग भाजपनं 21 लोकसभा मतदारसंघापैकी 14 जागा मागितल्या. ती मागणी बीजेडीनं धुडकावून लावली. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत बीजेडीचे 12 खासदार झाले होते तर भाजपचे 8. विधानसभेला बीजेडीनं स्पष्ट बहुमत मिळवत 112 जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं 23. काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये म्हणजेच फक्त 9 जागांवर विजयी झाली.

भाजप-बीजेडीचं म्हणणं काय आहे?

लोकसभेच्या 10 पेक्षा कमी जागा आम्ही लढल्या तर आमच्यासाठी ती राजकीय आत्महत्या असेल असं बीजेडीच्या नेत्यांचं म्हणनं आहे तर विधानसभेच्या 75 टक्के जागा बीजेडीला हव्या आहेत, ते आम्हाला मान्य नाही असं भाजप नेत्यांचं म्हणनं आहे. 

भाजप-बीजेडी युतीचा इतिहास

विशेष म्हणजे दोन्ही पक्षांची 11 वर्षे ओडिशात युती होती. 1998 ते 2009. म्हणजेच तीन लोकसभा आणि दोन विधानसभा दोन्ही पक्षांनी एकत्रीत लढलेल्या आहेत. ओडिशातल्या युतीचे शिल्पकारही दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन होते. बीजेडीकडून बिजय मोहपात्रांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com