विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रीया पुर्ण झाली आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती 23 तारखेला येणाऱ्या निकालाची. त्या आधी वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले आहेत. पण आतापर्यंत या सर्वातला वेगळा एक्झिट पोल समोर आला आहे. हा एक्झिट पोल सी-वोटरनं केला आहे. या पोलमधले आकडे धक्कादायक आहेत. त्यामुळे मविआ आणि महायुतीची धाकधूक नक्कीच वाढली आहे. हा सर्वे विभाग नुसार प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात कोण कोणत्या विभागात पुढे आहे याचीही फोड करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सी-वोटरने प्रकाशित केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीच्या पाड्यात 112 जागा टाकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 104 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे. तर 11 जागी अन्य निवडून येतील असं पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जवळपास 61 जागांवर कांटे की टक्कर असल्याचे यात सांगण्यात आले आहे. या जागांवर काय निकाल लागतो यावर सरकार कोण स्थापन करणार हे स्पष्ट होणार आहे. या 61 जागांवर अगदीच चुरशीची लढत होत आहे. विधानसभेच्या 288 जागांवर 20 नोव्हेंबरला मतदान झाले. त्याच दिवशी सी- वोटरने हा सर्वे केला आहे.
विदर्भात कोणाला किती जागा?
विदर्भात विधानसभेच्या 60 जागा आहेत. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. मात्र सी- वोटरने केलेल्या सर्वे नुसार महायुतीला विदर्भात 18 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीच्या पारड्याच 23 जागा टाकण्यात आल्या आहेत. तर जवळपास 16 जागांवर चुरशीच्या लढची होती. सध्याच्या स्थितीत या सोळा जागांवर कोण जिंकेल हे सांगता येणार नाही. त्यामुळेच या जागाचा निकाल महत्वाचा ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - सट्टाबाजारात आघाडी की महायुती? एक्झिट पोलनंतर सट्टाबाजाराचा अंदाज काय?
मराठवाड्याचा कौल कोणाला?
मराठवाड्यात विधानसभेच्या जवळपास 47 जागा आहे. त्यातील महायुतीला 14 जागा जिंकता येतील अशी स्थिती आहे. तर महाविकास आघाडी 20 जागा जिंकेल. तर जवळपास 13 जागांवर कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. विदर्भा प्रमाणे मराठवाड्यातही महाविकास आघाडीला आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. मात्र चुरशीच्या लढाईमध्ये कोण बाजी मारणार यावर पुढची सर्व गणितं अवलंबून आहेत.
उत्तर महाराष्ट्र कोणाच्या मागे?
उत्तर महाराष्ट्र हा नेहमीच भाजपचा गड राहीला आहे. या विभागात जवळपास 36 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातील 18 मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील. तर महाविकास आघाडीच्या पदरात 8 जागा पडण्याची शक्यता आहे. तर अन्यच्या पदरात 1 जागा जावू शकते. उत्तर महाराष्ट्रात 8 जागांवर चुरशीची लढत होत आहे. या जागांवर कोण जिंकेल हे आता सांगता येणार नाही अशी स्थिती आहे.
ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठे?
पश्चिम महाराष्ट्र पवारांना साथ देणार?
पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्वात जास्त 70 जागा आहेत. सी- वोटर नुसार महायुतीला यातील 25 जागा जिंकता येतील अशी स्थिती आहे. तर महाविकास आघाडीला 34 जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रावर नेहमीच शरद पवारांची पकड राहीली आहे. यावेळी राष्ट्रवादीमध्ये फुट पडली आहे. अशा वेळी पश्चिम महाराष्ट्राची जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवारही पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामतीतून निवडणूक लढत आहेत.
ठाणे- कोकणात बाजी कोणाची?
ठाणे आणि कोकणात एकूण 39 विधानसभेच्या जागा आहेत. हा पट्टा शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर इथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यात महायुतीला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 08 जागा मिळताना दिसत आहे. तर दोन जागा इतर ला मिळण्याची शक्यता आहे. 9 जागांवर कांटे की टक्कर असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत दबदबा कोणाचा?
मुंबईने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर मुंबईतली जनता कोणाला साथ देणार याबाबत उत्सुकता आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यातील महायुतीला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 10 जागा पडण्याची शक्यता आहे. अन्य ला 1 जागेवर विजय मिळेल.मात्र 08 जागेवर चुरशीच्या लढती होणार आहेत. यात कोणाचा विजय होईल त्यावर मुंबईत कोणाचे वर्चस्व हे स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world