
शुभम बायस्कर, अमरावती
लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा मोदी सरकार सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार स्थापन होताच उद्धव ठाकरे देखील भाजपसोबत येतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे हे 15 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सामील होतील, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी उघडलीय त्यातून 15 दिवसात उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये सामिल होतील. देशातील सर्व विरोधक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
नवनीत राणा यांच्या विजयाची देखील त्यांनी खात्री वर्तवली आहे. नवनीत राणा 2 लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. अमरावतीच्या जनतेने नवनीत राणांना आशीर्वाद दिला आहे, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.
(नक्की वाचा- अरूणाचल प्रदेशातून अजित पवारांसाठी आनंदवार्ता, विधानसभा निवडणुकीत काय झालं?)
यशोमती ठाकूर यांचा मेळघाट दौऱ्यावर टीका
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मेळघाट दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर रवी राणा यांनी सडकून टीका केली आहे. यशोमती ठाकूर यांचा हा दुष्काळ पाणी दौरा नसून नाटक दौरा आहे. मंत्री असताना त्या मेळघाटात गेल्या असत्या तर ही समस्या उद्भवलीच नसती, असा हल्लाबोल रवी राणा यांनी केला.
(नक्की वाचा - निवडणूक निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये मोठे फेरबदल)
यशोमती ठाकूर यांनी कितीही नौटंकी केली तरी अमरावती जिल्ह्यातील जनता जाणते. पालकमंत्री असताना काम केलं असतं तर आज मेळघाटात जावं लागलं नसतं. मेळघाटातील पाणीटंचाई संपवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व खासदार नवनीत राणा यांनी काम केलं. राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं, असंही रवी राणा यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world