NCP Pune Menifesto : राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी आगामी काळात काय काय योजना आणण्याचा मानस आहे याची माहिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीने अष्टसूत्री जाहीर केली.
यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यातही पुणेकरांना मोफत प्रवास देणार असल्याचं सांगितलं आहे. ही घोषणा गेमचेंजर ठरू शकते असं सांगितलं जात आहे. दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी, सर्वांसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. (Free metro and bus travel for Pune)
पुण्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीची अष्टसूत्री थोडक्यात...
खड्डे मुक्त - सुकर प्रवास
नळातून शुद्ध पाणी
नियमित स्वच्छता
हायटेक आरोग्य सुविधा
प्रदूषणमुक्त पुणे
झोपडपट्टींचं पुनर्वसन
जुन्या इमारतींचं पुनर्विकास
१५० पुणे मॉडेल शाळांची उभारणी
दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा
पुण्यात दरररोज आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. सर्व प्रभागांतील नळांमधून उच्च दाबाने दररोज पाणीपुरवठा केला जाईल. यामुळे सध्या उंच भागांमध्ये व कमी दाबाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणारी कमी दाबाने पाणीपुरवठा तसेच टँकरच्या समस्येपासून मुक्तता मिळेल. पीएमसीच्या सर्व ४१ प्रभागांमधील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या निश्चित वेळा काही महिने आधी जाहीर केल्या जातील. या नियोजनामुळे इमारतींना पाण्याच्या साठ्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, लहान वस्त्यांना त्यांच्या गरजेनुसार कमी वेळेत पाणी उपलब्ध होईल आणि व्यावसायिक आस्थापनांना स्वच्छता व कामांचे सुनिश्चित नियोजन करता येईल. प्रकाशित वेळापत्रकात कोणताही बदल असल्यास, किमान २ दिवस आधी एसएमएसद्वारे तसेच प्रत्येक सोसायटीतील सूचना फलकावर माहिती देणे बंधनकारक असेल.
मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत
दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी, सर्वांसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल. यामुळे कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होईल, शिक्षण आणि कामाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होईल, सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन मिळेल आणि खाजगी वाहनांवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल, ज्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मेट्रोची लास्ट माइल कनेक्टिविटी व फीडर बस सेवा सुधारणार.
पुणे महानगरपालिका १५० पुणे मॉडेल शाळांना मंजुरी
पुण्यात शाळांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी १५० पुणे मॉडेल शाळांना मंजुरी देण्यात येईल. लोकसंख्येच्या क्लस्टरनुसार टप्प्याटप्प्याने सीबीएसई आणि आयसीएसई मानकांनुसार नवीन शाळा सुरू करेल. या शाळांमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा, प्रशिक्षित शिक्षक, मराठीच्या पायाभूत ज्ञानासह इंग्रजी माध्यमाचे शिक्षण, क्रीडा सुविधा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध असतील. कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, प्रभाग निहाय आणि पारदर्शक देखरेख यामुळे महानगरपालिकेच्या खर्चात राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सुनिश्चित होईल, ज्यामुळे महागड्या खाजगी शाळांवरील अवलंबित्व कमी होईल.
टँकर माफियांचे १००% उच्चाटन
सर्व प्रभागांमध्ये टँकरच्या पाण्यावरचे अवलंबित्व पूर्णपणे संपवले जाईल. पीएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सार्वजनिक टँकर फेऱ्यांचा डेटाबेस प्रसिद्ध केला जाईल, ज्याद्वारे दरमहा टँकर वापरातील घट नोंदवली जाईल. मासिक पारदर्शकता अहवालांत कोणत्या प्रभागांनी सर्वप्रथम टँकरवरील अवलंबित्व शून्य केले, हे स्पष्टपणे दर्शवले जाईल. यासोबतच रेन वॉटर हारवेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर प्रणाली आणि प्रत्येक प्रभागात किमान एक सामुदायिक विहीर उभारण्यास प्रोत्साहन दिले जाईल व जल, पर्यावरण, भुगर्भशास्त्र क्षेत्रातील तज्ञाच्या मार्गदर्शनात दीर्घकालीन व शाश्वत कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्यात येईल.
झिरो-गळती पाणीपुरवठा नेटवर्क
पीएमसीच्या ४१ प्रभागांतील तसेच नव्याने समाविष्ट गावांमधील भूमिगत पाणीवाहिन्यांचा श्रेणीसुधार केला जाईल. प्रत्येक १ किमी अंतरावर सेन्सर-आधारित तंत्रज्ञान बसवले जाईल, ज्यामुळे दोन तासांच्या आत गळती शोधणे शक्य होईल. गळती दुरुस्तीसाठी २ तासांच्या आत कार्यरत होणारी जलद-प्रतिसाद पथके, १५ मोबाईल व्हॅनसह (१५ क्षेत्रीय कार्यालट प्रत्येकी एक) सज्ज ठेवली जातील. अतिरिक्त पाणीसाठ्याची उपलब्धता केली जाईल. शहराला आवश्यक असलेल्या पाण्याची तूट भरून काढण्यासाठी टाटाच्या मुळशी धरणातून अतिरिक्त ७ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध करून घेण्यात येईल. यासाठीची योजना मंजूर करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी केली जाईल. भामा आसखेड प्रकल्पातून बंद पाइपलाईन द्वारे पाणी आणण्याची, जलटाक्या आणि नेटवर्कची शिल्लक असलेली कामे पूर्ण करण्यात येतील.
पुढील २ वर्षाच्या कालावधीत खालील कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण करणार...
पुणे शहरातील ३३ मिसिंग लिंक आणि १५ मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधार करणार.
बाणेर-पाषाण लिंक रोड (६ महिन्यात पूर्ण)
कात्रज-कोंढवा रोड (६ महिन्यात पूर्ण)
बालभारती-पौड रोड
लोकमत-सावित्री गार्डन (धायरी) रोड
भुगाव-वारजे-नांदेड सिटी-नन्हे-जांभुळवाडी रोड (PMRDA
इंटरनल रिंग रोड)
वाघोली-लोहगाव लिंक रोड
बकोरी फाटा (वाघोली)-बकोरी रोड
वाघोली-नगर रोड बायपास (३० मी. रुंद)
खाडी मशीन चौक-वडकी रोड (६० मी. रुंद)
VIT कॉलेज-कोंढवा रोड
वाकड-कात्रज सर्विस सर्व्हिस रोड (पुणे-सातारा हायवे)
आयव्ही इस्टेट (Ivy Estate) रोड (वाघोली)
३६ कि. मी. चा हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रोड (HCMTR) (पुणे
शहराचा इंटरनल रिंग रोड)
पुणे स्वच्छता
पुणे २०२९ पर्यंत इंदौरला मागे टाकणार, स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या तीन शहरांत स्थान मिळवणार. १००% कचरा वर्गीकरण, कचरा कंपोस्टिंग, सांडपाणी शुद्धीकरण व पुनर्वापर, पावसाच्या पाण्याचे नियोजन (वॉटरशेड हारवेस्टिंग) आणि सौरऊर्जा वापर यांसारखे पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करात २०% सवलत देऊन प्रोत्साहन व ग्रीन सोसायटी म्हणून सन्मानचिन्ह दिले जाईल. शहरातील बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया व त्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पांची सखोल तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरणीय तपासणी करून त्यांच्या अपयशाची कारणमीमांसा केली जाईल व त्या आधारे आवश्यक संरचनात्मक सुधारणा करून हे प्रकल्प वैज्ञानिक व शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या चौकटीत पुन्हा कार्यान्वित करण्यात येतील. डी. पी. व आर. पी. मधील १३६५ कि. मी. पैकी फक्त ४२५ कि. मी. लांबीचे रस्ते पूर्णपणे विकसित आहेत, उर्वरित ९४० कि. मी. रस्त्यांची कामे न झाल्याने उपलब्ध रस्त्यांवर तान पडतो त्यामुळे उर्वरित ९४० कि. मी. रस्त्यांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करण्यात येतील. नव्याने समाविष्ट केलेल्या सर्व गावांतील रस्ते पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर विकसित करण्यात येतील. त्यामध्ये डिव्हायडर्स, स्वतंत्र फूटपाथ, एलईडी स्ट्रीट लाइट, सायनेजेस तसेच इतर आवश्यक सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रस्त्यावर खड्डा पडल्यास ७२ तासांच्या आत कंत्राटदाराच्या खर्चाने तो दुरुस्त केला जाईल. कामात कसूर करणाऱ्या कंत्राटदाराला दंड ठोठावला जाईल आणि त्याला काळ्या यादीत टाकले जाईल. रस्ते दीर्घकाळ टिकतील यावर भर असेल
मेडिकल सुविधा
पुणे महानगरपालिका क्षेत्रात २०० 'राजमाता जिजाऊ क्लिनिक' (अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र) उभारली जातील. येथे तपासणी, आरोग्य सेवा आणि महत्त्वाची औषधे मोफत मिळतील, ज्यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल. आनंदीबाई जनजागृती मोहीमः वरील सर्व आरोग्य केंद्रांच्या परिसरात दरमहा विशेष शिबिरे आयोजित केली जातील. याद्वारे नवविवाहित महिलांना सीझर टाळण्याचे उपाय, आरोग्य आणि सुरक्षित बाळंतपणाबाबत मार्गदर्शन केले जाईल. आई आणि बाळाचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर समुपदेशन आणि वैद्यकीय सल्ला दिला जाईल. MRI, CT स्कॅन व तत्सम चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देणाऱ्या लॅब PPP मॉडेल अंतर्गत उभ्या करणार. सध्या पीएमसीद्वारे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये मंजूर असलेल्या सुमारे ९४० बेडपैकी केवळ ४२५ बेड उपलब्ध आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी विद्यमान रुग्णालयांचे अद्ययावतीकरण केले जाईल तसेच नवीन रुग्णालयांची उभारणी करून एकूण बेडची वाढवली जाईल. विशेषतः वाघोली (५०० बेड), अण्णासाहेब मगर रुग्णालय, हडपसर (३०० बेड), वारजे (३५० बेड) तसेच कोंढवा-येवलेवाडी-महंमदवाडी (२५० बेड) येथे नवीन रुग्णालये उभारून व विद्यमान रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करून एकूण १,४०० अतिरिक्त रुग्णालयीन बेड उपलब्ध करून दिले जातील. आजच्या ४२५ बेडच्या ७ पट, असे एकूण २८०० बेड उपलब्ध होणार.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
