जाहिरात
This Article is From Apr 28, 2024

स्वतःच्या मुलावर वेळ आली तेव्हा....'त्या' प्रकरणाचा दाखला देत रामदास कदमांनी ठाकरेंना घेरलं

रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरेंच्या प्रचारासाठी दापोली येथील सभेत रामदास कदमांची तोफ धडाडली

स्वतःच्या मुलावर वेळ आली तेव्हा....'त्या' प्रकरणाचा दाखला देत रामदास कदमांनी ठाकरेंना घेरलं
दापोली:

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान जवळ आलेलं असताना प्रत्येक नेते आणि राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत दापोली येथील एका जाहीर सभेत बोलत असताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद -

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल तेव्हा माझे दुकान बंद करुन टाकेन असं सांगितलं होतं. मात्र नालायक उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि सोनिया गांधींचे पाय चाटत आहेत. देशाच्या पंतप्रधानांना शिव्या देताना उद्धव यांना लाज वाटायला हवी, स्वतःच्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद म्हणजे उद्धव ठाकरे असल्याचा घणाघात यावेळी रामदास कदमांनी बोलताना केला.

हे ही वाचा - विनायक राऊतांचा राणेंवर 'प्रहार' प्रॉपर्टीपासून भाड्यापर्यंत सर्वच काढलं

सूर्यावर थुंकलं ते आपल्यावरच पडतं - 

यापुढे बोलत असताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. "देशाचे पंतप्रधान, अमित शहा यांच्यावर बोलायची उद्धव ठाकरेंची लायकी आहे का? कोणावरती बोलताय, सूर्याकडे पाहून थुंकल्यास ते आपल्यावरच पडतं हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं." याचवेळी बोलत असताना कदमांनी संजय राऊत यांचा उल्लेख चिंबट व्यक्ती असा करत त्याच्याबद्दल न बोललेलं बरं असं म्हटलं.

हे ही वाचा - 'आरशात पाहिलं की औकात कळेल', श्रीकांत शिंदेंनी काढली आदित्य ठाकरेंची लायकी

मातोश्री हे आमच्यासाठी दैवत होतं. विजयी उमेदवाराची माँसाहेब आरती करायचे, तेव्हा उर अभिमानाने भरुन यायचा. आता मातोश्रीत काय चाललंय? असाही सवाल रामदास कदमांनी विचारला.

'त्या' प्रसंगाची आठवण करुन देत कदमांनी ठाकरेंना घेरलं -

यावेळी रामदास कदमांनी आणखी एका प्रकरणाचा दाखला देत उद्धव ठाकरेंची नाकाबंदी केली. "स्वतःच्या मुलावर जेव्हा प्रसंग आला आणि बलात्काराच्या गुन्ह्यात त्याचं नाव समोर आलं तेव्हा याच पंतप्रधानांना मागच्या दाराने जाऊन उद्धव ठाकरे गुपचुप भेटले. माझ्या मुलाला वाचवा म्हणून गुपचुप भेटता आणि त्यांच्यावरच आज टीका करता?" असा सवाल कदम यांनी विचारला.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ दापोली विधानसभा मतदारसंघातील केळशी , आसोंड, तेरेवायंगणी, पाजपंढरी येथे जाहीर सभा पार पडल्या.  या जाहीर सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com