राकेश गुडेकर, प्रतिनिधी
राजकारणात वाटा वेगवेगळ्या... पण मैत्री कायम... अगदी राजकारणापलीकडे.. अशी अनेक उदाहरणं आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे त्यापैकीच एक. मुळचे शिवसैनिक असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या राजकीय वाटा गेल्या काही काळापासून वेगळ्या होत्या. त्यानंतरही त्यांच्यातील मैत्री कायम होती.
या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही मित्र पुन्हा एकदा एकाच बाजूला आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. तर नारायण राणे त्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मित्रासाठी मनसेची फौज
नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले आहेत. राणेंच्या विजयासाठी स्वतः राज ठाकरे यांनी देखील कंबर कसलीय. राज यांनी मनसेची संपूर्ण फौज रणांगणात उतरवली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी कोकण दौरा केला होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील मनसे पदाधिरी, कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. नारायण राणेंच्या प्रचारात पूर्ण ताकदीने उतरण्याचा राज ठाकरे यांचा संदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवला आहे.
मनसेची रत्नागिरीत सभा
नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेची रविवारी (28 एप्रिल) रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे. शिर्के हायस्कूलजवळील मैदानात होणाऱ्या या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, प्रकाश महाजन, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, वैभव खेडेकर रत्नागिरीत येत आहेत. महायुतीचे उमेदवार नारायण राणे तसेच महायुतीचे अन्य नेते देखील यावेळी उपस्थित असणार आहेत. या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वांच्याच निशाण्यावर असणार आहे.
( नक्की वाचा : 'देवेंद्र फडणवीसच माझ्या मागे लागल्याने भाजपमध्ये गेलो' राणेंनी सांगितला किस्सा )
मनसेची भूमिका महत्त्वाची
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण तळकोकणात राणेंचं वर्चस्व देखील कायम आहे. आता शिवसेना दुभंगल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीत आहे. भाजपच्या नारायण राणे यांच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद उभी केलेली आहे. या मतदारसंघातील शिवसेनेच्या 4 आमदारांपैकी 2 आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे, तर 2 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
या दोन्ही जिल्ह्यातील मोठा मतदार वर्ग हा मुंबईत असतो. मुंबईत शिवसेनेची ताकद असली, तर मनसेची देखील मोठी ताकद मुंबईत आहे. मुंबईतील मोठा कोकणी वर्ग हा मनसेला मानणारा आहे. मनसेच्या मुंबईतील ताकदीचा उपयोग महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना होणार असल्याचं मानलं जातंय.
(नक्की वाचा : 'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं )
रविवारची सभा ही राणे साहेबांना विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी ही सभा असेल, असं मनसेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी 'NDTV मराठी'शी बोलताना सांगितलं. 'आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो आहोत. शिवसेनेच्या काळापासून दोघांनीही एकत्र काम केलेलं आहे. दोस्तीसाठी राजसाहेब काहीही करू शकतात, आताचं हे जिंवत उदाहरण आहे.
आपल्या मित्रासाठी कोणतेही आढेवेडे न घेता ते मैदानात उतरले आहेत. आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी राणे साहेबांच्या प्रचारात झोकून देण्याचा आदेश दिलाय. त्यांचा आदेश आमच्यासाठी शिरसंवाद्य आहे. त्या आदेशाचं पालन करत आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रचारात झोकून दिलंय. राज साहेबांच्या या मित्राला निवडून आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही', असं सौंदळकर यांनी सांगितलं.
2 जुन्या शिवसैनिकांचा 'सामना'
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीतून शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते विश्वासू आणि अत्यंत जवळचे मानले जातात. राऊत यांनी नेहमीच राणे यांना अंगावर घेतलेलं आहे. त्यामुळेच राऊत यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे रविवारी (28 एप्रिल) रत्नागिरीत येत आहेत. सायंकाळी त्यांची सभा होणार आहे. याचदरम्यान मनसेची देखील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी प्रचारसभा होणार आहे.
( नक्की वाचा : गाड्या, बंगले, बँक बॅलन्स... अबब! नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती? )
नारायण राणे व राज ठाकरे हे देखील एकेकाळी शिवसेनेतील दिग्गज आणि प्रभावी नेते होते. पण अंतर्गत राजकारणातून दोघांनीही शिवसेना सोडली. शिवसेना सोडताना दोघांचाही रोख हा उद्धव ठाकरे यांच्यावरच होता. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यानंतर स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला, पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने देखील त्यांना राज्यसभेवर पाठवत केंद्रीय मंत्री केलं. तर, राज ठाकरे यांनी स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन करत स्वत:ची राजकीय वाटचाल सुरू ठेवली.
राज आणि राणे या दोघांनीही उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या शह देण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यावर नेहमीच टीकेचे बाण सोडले. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नारायण राणे आणि राज ठाकरे हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world