पवार आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहित आहेत. बुधवारी शरद पवारांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात जोरदार फटकेबाजी करत सभा गाजवली. शिर्डी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पवारांनी सभा घेतली.या सभेत शरद पवारांनी विखे पाटलांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. शिर्डी मतदार संघात दहशत माजवली जात आहे. लोकशाहीमध्ये असं जर कोणी करत असेल तर त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराही यावेळी शरद पवारांनी दिला. शिवाय यावेळी त्यांनी विखेंचे आणखी एक राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांचेही कौतूक केले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या भागाची मला चिंता वाटते असं शरद पवार म्हणाले. पुर्वी या ठिकाणी पेरूच्या मोठ्या प्रमाणात बागा होत्या. मात्र आता हे क्षेत्र घटलं आहे. पाणी कमी असल्याचं कारण सांगितलं जातं. असं असेल तर इथला आमदार कोण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता पवारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांना तुम्ही अनेक वेळा निवडून दिलं. अनेक वेळा ते मंत्री ही होते. सर्व साधन सामुग्री आणि यंत्रणा ही त्यांच्या हाताखाली होती. पण या नेतृत्वाला सामान्य माणसाची चिंता नाही. पाणीसाठी दोनशे कोटी आल्याचे सांगत होते. पण ते गेले कुठे असा प्रश्नही पवारांनी केला. मोठे आकडे सांगायचे आणि लोकांना भुलवायचं हा दृष्टीकोन इथल्या नेतृत्वाचा आहे असा आरोपही त्यांनी केली.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री येती घरी, खड्डे भरणीचा मुहूर्त ठरी!; अंबरनाथकरांमध्ये रंगली चर्चा
नगरमध्ये गोरगरीबांच्या मुलांसाठी नॉलेज सिटी उभारण्याचा विचार आपण केला होता असे पवार म्हणाले. त्यात सर्व प्रकारचे शिक्षण गरीबांच्या मुलांना दिले जाणार होते. त्यासाठी शेती महामंडळाची जमिनही दिली जाणार होती. पण त्यावेळी त्यात कोणी तरी खोडा घातला असा आरोपही पवारांनी विखेंचे नाव न घेता केला. जर इथं नॉलेज सिटी झाली तर आमच्या कॉलेजचं काय होणार याची चिंता त्यांना होती. जर गोरगरीबांच्या मुलांनी तिथं शिक्षण मिळायला लागलं तर आमच्याकडे कोण येणार याची जास्त काळजी त्यांना होता. त्यामुळेच या लोकांनी खोडा घातला. विखेंच्या अनेक संस्था या नगर जिल्ह्यात आहेत.
इथले आमदार आज ज्या पक्षात आहेत तो पक्ष त्यांचा आहे का? ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी सत्तेसाठी वाट्टेल ती तडजोड केली. वाट्टेल त्या गोष्टी केल्या. अशा लोकांकडून विकास कधीच होणार नाही. नगरच्या विकासात जर कोणाचा हात असेल तर बाळासाहेब थोरातांचा आहे अशी कौतूकाची थापही पवारांनी थोरातांना दिली. निळवंडेचं काम जर कोणामुळे झालं असेल तर ते बाळासाहेब थोरातांमुळे झाल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विखेंच्या मतदार संघातले रस्ते कसे आहेत याचे ही उदाहरण दिले. लोणी वरून जुन्नरला जात होतो. त्यावेळी हा रस्ता आहे का? असा प्रश्न पडला होता. प्रवासात हाडांची चाळण झाली. ज्या माणसाला आपल्या मतदार संघातील मुख्य रस्तेही करता येत नाहीत तो कसला विकास करणार.
नगर जिल्ह्यातील काही लोक मला भेटले होते. त्यांनी या ठिकाणी प्रचंड दहशत आणि दडपशाही असल्याचे सांगितले. काही करून ही दडपशाही बंद करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ही लोकशाही आहे. लोकशाही मध्ये जर कोणी दहशत आणि दडपशाही वापरत असेल तर ती उद्धवस्त करण्याची ताकद तुमच्यात आहे. इथल्या दहशतवादाला घाबरू नका. हिंम्मत असेल तर समोरा समोर लढा असे आव्हानच पवारांनी विखेंना दिलं. कुठे पोस्टर फाड, कुठे बॅनर काड अशी काम करणं सोडा असंही पवार म्हणाले. उद्धवस्त करण्यासाठी अक्कल लागत नाही, काही उभं करायचं असेल तर अक्कल लागते असा टोलाही पवारांनी लगावला. शिवाय ही दहशतवाद्यांची टोळी आहे. या टोळीचा या निवडणुकीत बंदोबस्त करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
त्यामुळेच हे असलं राजकारण संपवलं पाहीजे. इथलं चित्र बदलायचा निकाल इथल्या जनतेला घ्यावा लागेल असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळेच काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभावती या माझ्या मुली सारख्या आहेत. शिवाय ज्या घरातल्या त्या सुनबाई आहेत त्या घरा बरोबर ही माझे जवळचे संबध आहेत. त्यामुळे मी सांगितल्यावर तुम्ही त्यांना मतदार करणार ना असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिर्डी विधानसभा मतदार संघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्यात लढत होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world