आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत आणखी एका जागेवर दोन शिवसैनिकांमध्ये सामना रंगताना दिसणार आहे. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाकडून रविंद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. आज वायकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
किर्तीकर आणि वायकरांमध्ये रंगणार सामना -
शिवसेना उबाठा गटाने या मतदारसंघात याआधीच अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आतापर्यंत किर्तीकर यांनी आपला प्रचारही सुरु केला आहे. परंतु महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला जागावाटपातल्या रस्सीखेचामुळे उमेदवारी घोषित करण्यासाठी वेळ लागला. या जागेसाठी वायकरांसोबत अनेकांची नावं चर्चेत होती.
परंतु काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या गटात सहभागी झालेल्या रविंद्र वायकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रविंद्र वायकर हे ईडी चौकशीमुळे चर्चेत आले होते. ईडी चौकशीचा ससेमिरा सोडवण्यासाठीच त्यांनी शिंदेंच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
हे ही वाचा - ठाण्याचा उमेदवार कोण? आज घोषणा होणार? तीन नावे चर्चेत
गजानन किर्तीकरांचं नावही होतं चर्चेत -
याच मतदारसंघात विद्यमान खासदार आणि शिंदेच्या गटात सहभागी झालेले गजानन किर्तीकर यांचं नाव चर्चेत होतं. परंतु मुलगा निवडणुकीला उभा राहिल्यास आपण लढणार नाही असं गजानन किर्तीकर यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे उबाठा गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर गजानन यांनी निवडणुकीच्या रिंंगणातून माघार घेतली. त्यामुळे एकेकाळचे उद्धव ठाकरेंचे शिलेदार मानले जाणारे वायकर आता किर्तीकरांना कसं आव्हान देतात हे पहावं लागणार आहे.
हे ही वाचा - भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारफेरीवर दगडफेक, गोवंडी येथील घटना
दक्षिण-मध्य मतदारसंघातही शिवसैनिकांमध्ये लढत -
याआधी दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातही दोन शिवसैनिकांची लढत पहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल देसाई तर शिंदेंची साथ दिलेल्या राहुल शेवाळेंमध्ये या मतदारसंघात लढत पहायला मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world