सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. काँग्रेसने दावा केलेल्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदावार दिल्याने पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडीची जागा ठाकरे गटाला सुटल्याने काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे.
सांगलीतील या राजकारणावरुन काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह उद्धव ठाकरेंनाही खडेबोल सुनावले. सांगली येथे आयोजित काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हान हे देखील उपस्थित होते.
(नक्की वाचा- 'उबाठा' च नाही तर भाजपासह 'या' पक्षांनाही निवडणूक आयोगानं बजावलीय नोटीस)
विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, मागील तीन महिन्यांपासून आम्ही या जागेती मागणी करत होतो. ही जागा आम्हाला मिळावी सर्वोतोपरी प्रयत्न आम्ही केले. एका तरुण सहकाऱ्याला आम्ही येथे तयार केल. मी स्वत: विशाल पाटील यांना आश्वासन दिलं की तुला विश्वजीत कदम निवडून आणेल. तरुण कार्यकर्त्याला मी विश्वास दिला.
आम्ही जिल्ह्यात काँग्रेस एकत्र ठेवली. आज देशातील वातावरण फार वेगळं आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि महायुतीला रोखण्यासाठी आपण महाविकास आघाडी केली. पण याठिकाणी जेव्हा जागावाटपाची चर्चा सुरु झाली, त्यावेळी या जागेवर काँग्रेसचाच दावा होता. आम्हाला काँग्रेस नेत्यांनीही हो सांगितलं. त्यामुळे मीही लोकांना सांगत सुटलो की सांगलीत काँग्रेसचा खासदार होईल, असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं.
सांगलीची जागा देणे चुकीचेच
महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळायला तयार होतो. हातकणंगलेची जागा शिवसेना ठाकरे गटाने घ्यायला हवी होती. परंतु चंद्रहार पाटलांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. अचानक उद्धव ठाकरे सांगलीत आले आणि या जागी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. मात्र किमान आम्हाला विचारायचं तरी. एकतर जागा देणेच चुकीचे होते, हे माझं ठाम मत आहे. कुठे काय सुरु होतं याकडे तुमचं लक्ष नव्हतं का, असा सवाल विश्वजीत कदम यांनी काँग्रेस नेत्यांना विचारला.
नक्की वाचा- आईसाठी लेक मैदानात! रेवती सुळेंनी मागितला मतांचा जोगवा
सापशिडीच्या खेळात अंतिम विजय आमचाच
काँग्रेसला ही जागा मिळावी यासाठी मी मनापासून प्रयत्न केले. पण मी माझ्यासाठी नाहीतर हाताच्या पंजासाठी लढत होतो. काँग्रेसला जागा मिळावी हे सगळ्यांना मान्य होतं, मग शेवटी काय झालं. सापशिडीच्या खेळात आज आम्हाला साप चावला आहे. मात्र या खेळात अंतिम विजय आमचा राहील, अशा शब्द तुम्हाला देतो. ज्यांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला त्यांना उत्तर दिलं जाईल, असा इशाराही विश्वजीत कदम यांनी दिला.
आम्ही सरळ वाटेने जात होतो, आम्हाला रोखण्याचा प्रयत्न कशाला केला? पतंगराव कदम सरळ होते म्हणून कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. कटकारस्थान करणाऱ्यांना सांगतो की पतंगरावांचे गुण माझ्यात आहेत आणि माझे स्वत:चेही काही गुण आहेत, असंही विश्वजीत कदम यांनी म्हटलं.
सांगलीत १०० टक्के काँग्रेसची मते
पुढे विश्वजीत कदम यांनी निक्षून सांगितलं की, आमच्या तोंडचा घास हिसकावून गेला. जिल्ह्याबाबत घडलं ते पुन्हा घडता कामा नये. मित्रपक्षाला सांगा की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला सांगलीत जी काही मतं मिळतील ती १०० टक्के काँग्रेसची मतं असतील. नंतर त्यांनी पुन्हा आवाज काढायचा नाही की विधानसभा द्या. काँग्रेसच्या नेत्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्या, असं आवाहन विश्वजीत कदमांनी काँग्रेस नेत्यांना केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world