Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवारी (7 मे 2024) पार पडले. मात्र महाराष्ट्रातील मतदानाची घसरलेली टक्केवारी चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर का पडले नाहीत, याचा विचार निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्षांनी करणे गरजेचं आहे. मतदानापासून दूर राहण्याची काय कारणे असू शकतात, यावर तज्ज्ञांचं काय मत आहे? हे NDTV मराठीने जाणून घेतले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'महाराष्ट्र टाईम्स'चे पुणे आवृत्तीचे सहसंपादक जितेंद्र अष्टेकर यांनी सांगितले की, "मतदारांमध्ये उत्साह निर्माण करू शकेल असा मुद्दा प्रचारामध्ये आणण्यात सगळेच पक्ष अपयशी ठरले. ग्रामीण भागात प्रस्थापितांविरोधात राग आहे. मात्र तो वर्ष 2014 मध्ये जशी लाट निर्माण झाली होती, तशा तीव्र लाटेत रुपांतरीत होऊ शकलेला नाही."
नक्की वाचा- मतदारांचा निरुत्साह कायम; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, आकडेवारी समोर
प्रचार राष्ट्रीय मुद्यांऐवजी स्थानिक मुद्यांभोवती फिरला
"मतदार याद्यांमधील गोंधळ, मतदान केंद्रे न सापडणे यामुळेही टक्केवारीवर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात झालेला प्रचार हा राष्ट्रीय मुद्यांऐवजी स्थानिक मुद्यांभोवती फिरणारा दिसला. प्रचाराचा जो आवेग पाहायला मिळत होता, तो फक्त माध्यमांमध्येच दिसत होता. हाच आवेग प्रत्यक्षात दिसला नाही. जिथे चुरशीची लढत आहे, तिथे मतदारांनी मतदानामध्ये उत्साह दाखवल्याचं मतदानाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे", असंही जितेंद्र अष्टेकर यांनी म्हटलं.
(नक्की वाचा: EVMची पूजा करणे महागात पडलं, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल)
सत्ताधारी पक्षाबद्दल मतदारांमध्ये नाराजी?
'लोकमत'चे विशेष प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी सांगितले की, "सत्ताधारी पक्षाबद्दल लोकांमध्ये नाराजी असेल आणि लोकांना पर्यायही फारसा पसंत नसेल तर मतदानात मतदारांचा निरुत्साह जाणवतो. यावेळच्या निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यात मतदारांचा निरुत्साह जाणवल्याने मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना राबवल्या. उष्णतेच्या लाटेमुळे पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्याचा अंदाज आयोगाने लावला होता. त्या अनुषंगाने तिसऱ्या टप्प्यात मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना करूनही मतदान वाढले नाही. याचा अर्थ सत्ताधारी पक्षाबद्दल मतदारांमध्ये नाराजी असण्याची शक्यता आहे", असे मत दीपक भातुसे यांनी मांडले.
राज्यातील मतदानाची आकडेवारी (अंदाजे)
मतदारसंघ | 2024 ची टक्केवारी | 2019 ची टक्केवारी |
बारामती | 64.08 टक्के | 47.84 टक्के |
सांगली | 52.56 टक्के | 84 टक्के |
कोल्हापूर | 63.71 टक्के | 74.02 टक्के |
रत्नागिरी-सिंधुदुर्ग | 53.75 टक्के | 65.06 टक्के |
सातारा | 54.11 टक्के | 64.01 टक्के |
सोलापूर | 49.17 टक्के | 62.04 टक्के |
रायगड | 50.31 टक्के | 64.09 टक्के |
धाराशिव | 55.98 टक्के | 68.01 टक्के |
माढा | 50.00 टक्के | 68.08 टक्के |
हातकणंगले | 62.18 टक्के | 74.04 टक्के |
लातूर | 55.38 टक्के | 65.06 टक्के |
Lok Sabha 2024 | महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण, कसा होता महाराष्ट्राचा इलेक्शन मूड?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world