लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक घडामोडी घडत आहेत. एकेकाळचे सहकारी आता विरोधक झाले आहेत. तर विरोधात असलेले मित्र झाले आहे. त्यामुळे राजकारणाची खिचडी झालेली दिसते. अशात युती आणि आघाडी धर्माचे पालन आपण कसे करत आहोत हे दाखवण्याची सगळीकडेच स्पर्धा सुरू आहे. त्यात आता रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम पुढे सरसावले आहेत. त्यांच्या एका विधानाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंसाठी शिवसेनेच्या योगेश कदम यांनी पण केलाय. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक त्यांचे राजकीय भवितव्य ठरवणारीच ठरणार आहे.
हेही वाचा - शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान!
योगेश कदम यांचा पण काय?
योगेश कदम हे दापोलीचे आमदार आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. सध्या ते महायुतीचे घटक आहे. दापोली मतदार संघ हा रायगड लोकसभेत येतो. इथे महायुतीकडून सुनिल तटकरेहे मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनंत गिते हे मैदानात आहेत. अशा वेळी योगेश कदम यांनी तटकरेंसाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. काही करून शिवसेनेच्या अनंत गितेंना पराभूत करायचे असेच त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे दापोली विधानसभेतून एक दोन नाही तर 25 हजारांचे लिड तटकरेंना देणार. जर तेवढे लीड दिले नाही तर भविष्यात विधानसभा निवडणूक लढवणार नाही असा पणच त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या पणामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आपले राजकीय भवितव्य डावावर लावले आहे.
गितेंवर कदमांचा हल्लाबोल
अनंत गितेंनी आमच्या पैशाच्या जोरावर 2014 ची निवडणूक जिंकली होते असा गौप्यस्फोटही यानिमित्ताने योगेश कदम यांनी केला आहे. तेव्हा आमचा पैसा पापाचा नव्हता का? असा प्रश्नही कदम यांनी यावेळी केला. कुणबी समाजच यांना प्रत्येक गावातून लाथ मारून बाहेर काढेल, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत कदम घराण्यामुळे अनंत गीते खासदार होऊ शकले. आमच्या पैशाच्या जोरावर 2014 ची निवडणूक जिंकले, तेव्हा आमचा पैसा पापाचा नव्हता का ? असा सवाल त्यांनी केला आहे. कदम घराणे संपवायची भाषा करता, या पुढे गीते लोकसभा सोडा, पण एखादी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा जिंकून येऊ शकत नाहीत. माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे असेही कदम म्हणाले. त्यामुळे आगामी काळात कदम विरूद्ध गिते यांच्यात वाकयुद्ध रंगणार हे स्पष्ट आहे.
रायगडमध्ये गिते विरूद्ध तटकरे सामना
रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गिते यांच्यात सामना रंगणार आहे. 2019 च्या निवडणुकीच सुनिल तटकरे यांनी अनंत गितेंचा पराभव केला होता. तर त्याधीच्या निवडणुकीत गितेंनी तटकरेंवर निसटता विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड 2019 च्या निवडणुकीत तटकरेंनी केली होती. आता स्थिती बदलली आहे. दोन्ही उमेदवार तेच असले तरी आघाडी आणि युती बदलली आहे. अशा स्थितीत गिते पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहेत. तर तटकरे पुन्हा एकदा दिल्लीत जाण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world