
Gold-Silver Rates : सोन्याच्या दराने ऐतिहासिक एक लाख रुपये प्रति तोळेचा टप्पा पार केला आहे. ऐन लग्नासराईच्या दिवसात सोन्याच्या वाढत्या दरामुळे नागरिकांचा अधिकचा खर्च वाढला आहे. मात्र सोन्याची किंमत इथवरच थांबणार की आणखी वाढणार याची देखील उत्सुकता गुंतवणूकदारांना लागली आहे. जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सोन्याचे दर येत्या काळात सव्वा लाखांचा टप्पा गाठतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
सोन्याचे दर आधीही महाग होते, आताही महाग आहेत आणि भविष्यातही महागच राहतील. अमेरिकेत ट्रम्प सरकार आलं त्याचवेळी सोन्याच्या दरात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे सोन्याचे दर वाढले देखील. गोल्डमॅन सॅक्सने देखील सोने लाखांचा टप्पा पार करेल असा अंदा व्यक्त केला होता. तो अंदाजही खरा ठरला आहे. आता त्यांचा आणखी एक रिपोर्ट आला आहे. त्यात त्यांनी सोने 2025 मध्येचे 4500 डॉलर प्रति औंस पार गेले तर चकीत होण्याची गरज नाही. म्हणजेच सोने सव्वा लाखांचा टप्पा यावर्षात पार करेल असा अंदाज गोल्डमॅन सॅक्सचा आहे, असं राजेश रोकडे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Gold Price : सोन्याची किंमत एक लाखांपेक्षा जास्त का वाढली? भविष्यात दर कमी होणार का? वाचा A to Z माहिती)
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीचा सल्ला
सोन्याची किंमत 56 हजारांवर येणार अशी अफवा देखील काही दिवसांपूर्वी पसरली होती. सोन्याचे दर कधी खाली येतात असं मला वाटत नाही. काही प्रॉफिट बुकिंग होईल. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात, अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करावं. सोन्यांचे दर कमी होतील याची वाट न पाहता टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करण्याचं आवाहन राजेश रोकडे यांनी केलं.
जगभरातील अशांततेच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. जगभरातील सेंट्रल बँकांना देखील सोनं सुरक्षित गुंतवणूक वाटत आहे. त्यामुळे सगळ्या सेंट्रल बँका सोनं खरेदी करत आहेत. फेडरल रिझर्व्ह बँकेचे रेट कट येत्या काळात अपेक्षित आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात जर फेडरल बँकेने रेट कमी केले तर सोन्याला आणखी बूस्ट मिळू शकतो, असं मत राजेश रोकडे यांनी व्यक्त केले.
मागील दोन महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अक्षय्यतृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात अशीच वाढ झाली तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. भारतातील सर्वात मोठा सोने खरेदीचा दिवस अक्षय तृतीया जवळ येत असल्याने सोन्याचे भाव आणखी वाढतील, असा अंदाजही राजेश रोकडे यांनी व्यक्त केला आहे.
( नक्की वाचा : Gold Price : लग्नसराईत होणार खिसा रिकामा! वाचा काय आहे कारण? )
चांदी देखील नवा विक्रम गाठेल
चांदी आणि सोने दोघेही सोबतच वाढतात. सोन्यापेक्षा चांदीचे दर जास्त वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी ३५०० टन चांदी निर्यात करण्यात आली होती. तो आकडा 2024 ला दुप्पट झाला होता. याचा अर्थ चांदीचं मार्केट खूप मोठं झालं आहे. त्यामुळे चांदीला दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. चांदीमध्ये देखील खूप उठाव आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात चांदी देखील एक नवीन विक्रम गाठेल, असा अंदाज राजेश रोकडे यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world