
गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी मुक्त व्यापार करारावर (India UK Free Trade Agreement) सही केली. दोन्ही देशांसाठी आणि खासकरून भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. अमेरिकेने भारतावर जबरी टॅरीफ लादल्यानंतर भारताने त्यातून मार्ग काढण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले होते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ब्रिटेनसोबत मुक्त व्यापारी कराराच्या चर्चांना चालना देणे हा एक महत्त्वाचा प्रयत्न होता. या प्रयत्नांना यश आले असून ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या 90 टक्के वस्तू स्वस्त होतील तर भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या 99 टक्के वस्तू स्वस्त होणार आहेत. या करारामुळे ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या स्कॉच आणि व्हिस्कीच्या किंमती बऱ्याच प्रमाणात कमी होतील.
या करारामुळे दारूव्यतिरिक्त, विविध कार, ब्रँडेड मेकअप उत्पादने आणि काही खाद्यपदार्थ स्वस्त होणार आहेत. एकीकडे भारतीयांना हा फायदा होणार आहे तर दुसरीकडे भारतीय उत्पादनांच्या किंमती कमी झाल्याने ब्रिटनमध्ये त्यांना असलेली मागणी फार वाढेल असाही अंदाज आहे. या उत्पादनांमध्ये कापड, मौल्यवान वस्तू, इंजिनिअरिंगपासून ते ऑटो सेक्टरपर्यंत असंख्य गोष्टींचा समावेश आहे.
( नक्की वाचा: सर्वाधिक विवाहबाह्य संबंध असणाऱ्या शहरांची यादी जाहीर, मुंबई कितव्या स्थानी? )
दारू किती स्वस्त होणार?
या करारामुळे ब्रिटनमधून भारतात येणारी स्कॉच,व्हिस्की स्वस्त होईल. ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्कीवर सध्या 150 टक्के आयात शुल्क असून ते सुरुवातीला 75 टक्क्यांवर येईल आणि येत्या 10 वर्षांत ते 40 टक्क्यांपर्यंत खाली येईल. जिन (Gin) देखील स्कॉच आणि व्हिस्कीप्रमाणे स्वस्त होणार आहे.
कारही स्वस्त होणार
निसान, टोयोटा सारख्या सामान्य कार्सपासून लोटस-मॉर्गन बेंटले, जग्वार, लँडरोव्हर, मॅकलेरेन आणि रोल्स रॉयस (Rolls-Royce) सारख्या लक्झरी कार स्वस्त होतील. यावरील आयात शुल्क 100% वरून थेट 10% पर्यंत खाली येईल.
ब्रँडेड कॉस्मेटिक उत्पादने परवडणाऱ्या दरात मिळणार
ब्रिटनच्या लश, द बॉडी शॉप (The Body Shop), रिमेल लंडन (Rimmel London) यांसारख्या ब्रँडेड कॉस्मेटिक कंपन्यांची सौंदर्य उत्पादने स्वस्त होतील. ब्रिटनने भारतीय मेकअप ब्रँड्स मायसन आणि नायकासोबत (Nykaa) भागीदारीही केली आहे.
चॉकलेट-बिस्किटे स्वस्त होणार
भारत ब्रिटनच्या चॉकलेट्स, बिस्किटे इत्यादी खाद्य उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करून ते किमान पातळीवर आणणार आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीजनेही चीज, तूप आणि पनीर यांसारख्या उत्पादनांसाठी इतर कंपन्यांशी करार केला आहे, ज्यामुळे ब्रँडेड कंपन्यांची दुग्धजन्य उत्पादने स्वस्त होतील.
( नक्की वाचा: भगवान शंकराच्या मंदिरावरून दोन देशांत वाद, सुरू झाले भीषण युद्ध )
ब्रिटन सध्या भारताच्या कपड्यांवर आणि इतर वस्त्रोद्योगाच्या वस्तूंवर 8% ते 12% आयात शुल्क लावते, जे आता पूर्णपणे काढून टाकले जाईल. यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनामच्या तुलनेत ब्रिटनमध्ये भारतीय कपडे अधिक स्वस्त होतील. तिरुपूर, सुरत आणि लुधियाना येथील वस्त्रोद्योगाला याचा फायदा मिळेल.ब्रिटन भारताच्या सेवा क्षेत्रासाठी नियमांमध्ये शिथिलता देईल. कमी कालावधीच्या रोजगारासाठी भारतातून येणाऱ्या तरुणांना सवलत मिळेल. त्यांना सोशल सिक्युरिटी टॅक्स सारख्या गरजा लागणार नाहीत. यामुळे योग शिक्षक, शेफ, संगीतकार आणि इतर क्षेत्रातील तरुण सहजपणे ब्रिटनला जाऊ शकतील.
भारताच्या रत्न-आभूषणे आणि चामड्याच्या उत्पादनांना ब्रिटनमध्ये नवीन बाजारपेठ मिळेल. यावर कोणतेही शुल्क लागणार नाही, ज्यामुळे सोने-चांदीचे दागिने आणि चामड्याची उत्पादने ब्रिटनमध्ये स्वस्त होतील. कानपूर, आग्रापासून ते सुरत आणि मुंबईपर्यंतच्या उद्योगांना याचा फायदा मिळेल. ब्रिटन भारतात बनवलेल्या मशिनरी, इंजिनिअरिंग टूल्स आणि ऑटो पार्ट्सवरील आयात शुल्क रद्द करेल. यामुळे भारतीय उत्पादने तिथे स्वस्त होतील. पुणे, चेन्नईपासून ते नोएडा-गुरुग्रामपर्यंतच्या उद्योगांना याचा फायदा होईल. भारतीय इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन उत्पादकांनाही दिलासा मिळेल. ब्रिटन भारताच्या आयटी आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात व्हिसा नियमांमध्ये शिथिलता देईल. यामुळे इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट आणि अकाउंटिंग सारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय व्यावसायिकांना ब्रिटनमध्ये नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. आयटी-फायनान्स, कायदा आणि आरोग्यसेवा क्षेत्रात पुढील 5 वर्षांत 60,000 पेक्षा जास्त नवीन रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
याशिवाय भारताच्या कृषी आणि खाद्य उत्पादनांची ब्रिटनमध्ये निर्यात स्वस्त होईल. यामध्ये बासमती तांदूळ, प्रीमियम चहापत्ती, मसाले आणि सागरी उत्पादनांवरील आयात शुल्क ब्रिटन रद्द करेल. केरळ-बंगालपासून ते आसाम आणि गुजरातपर्यंत याचा फायदा दिसून येईल. रसायन, सौर ऊर्जा आणि प्लास्टिकपर्यंतच्या भारतीय उद्योगांना दिलासा मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world