Lok Sabha Elections Result 2024: लोकसभा निवडणूक 2024मधील जनादेशाचे चित्र स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली NDA सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सरकार स्थापन करणार आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (BJP) विजयी उमेदवारांचा आकडा बहुमताचा आकड्यापेक्षा ( 272) पेक्षा कमी आहे. भाजपला केवळ 240 जागांवर यश मिळाले आहे, तर एनडीएने 293 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत एनडीएचे दोन मोठे साथीदार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या असणार आहेत. दुसरीकडे 232 जागांवर इंडिया आघाडीने विजय मिळवला आहे. यामुळे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासारखे चेहरे विरोधी बाकावर असतील.
दरम्यान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (5 जून 2024) दुपारी राष्ट्रपतींकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा सुपूर्द केला. तसेच संध्याकाळच्या सुमारास त्यांची एनडीएच्या नेतेपदीही निवड झाली. 8 जून रोजी शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. दरम्यान मोदी सरकार 3.0 मध्ये कोणाकोणाला मंत्रिपद मिळू शकते? याविषयीही चर्चा केली जात आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
(नक्की वाचा: पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... )
या मंत्र्यांना सरकारमध्ये पुन्हा मिळणार संधी?
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिले नेते आहेत, जे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्व मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाऊ शकते. या निवडणुकीत अमित शाह यांनी गांधीनगर (गुजरात), राजनाथ सिंह यांनी लखनौ (उत्तर प्रदेश), नितीन गडकरी यांनी नागपूर (महाराष्ट्र), पीयूष गोयल यांनी मुंबई उत्तर (महाराष्ट्र), गजेंद्र सिंह शेखावत यांनी जोधपूर (राजस्थान), भूपेंद्र यादव यांनी अलवरमधून निवडणूक जिंकली आहे. या सर्व नेत्यांना नरेंद्र मोदींच्या टीममध्ये पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कोणाला कोणते खाते मिळणार, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
(नक्की वाचा: उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला)
पराभूत उमेदवारांना मिळणार संधी?
घटनात्मक तरतुदीनुसार सरकारच्या मंत्रिमंडळात लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपर्यंत मंत्र्यांचा समावेश असू शकतो. म्हणजेच नवीन सरकारमध्ये पंतप्रधानांव्यतिरिक्त 78 मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
(नक्की वाचा: विजयानंतर राजेंना अश्रू अनावर, दमयंती राजेंनी तेव्हा काय केलं?)
NDAच्या प्रस्तावात 21 जणांची नावे?
मोदी 3.0 सरकारमध्ये कोणत्या घटक पक्षांमधील किती लोकांचा मंत्रिमंडळाचा समावेश होणार आहे? हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बुधवारी मंजूर करण्यात आलेल्या एनडीएच्या ठरावात एकूण 21 जणांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये चंद्राबाबू नायडू यांचे नाव पाचव्या क्रमांकावर तर नितीश कुमार यांचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे. एनडीएचा मित्रपक्ष टीडीपीने लोकसभा निवडणुकीत 15 जागा तर जेडीयूने 12 जागा जिंकल्या आहेत. भाजपनंतर एनडीएमध्ये हे दोन पक्ष संख्यात्मकदृष्ट्या सर्वात मोठे ठरले आहेत. हे दोन्ही पक्ष मोठ्या मागण्या करू शकतात, असे म्हटले जात आहे.
अनेक माजी मुख्यमंत्रीही मंत्रिपदासाठी करू शकतात दावा
मोदी सरकारमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचा टीम मोदीमध्ये समावेश केला जाऊ शकतो. दुसरीकडे निवडणुकीत विजयी झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा मित्रपक्ष 'हम'चे नेते जीतन राम मांझी यांचाही समावेश आहे. ते देखील काही गोष्टींसाठी दावा करू शकतात, असे म्हटले जात आहे.
सरकारचा रोडमॅप तयार
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच सरकारच्या कामकाजाचा रोडमॅप तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. निकालानंतरच्या भाषणातही मोदींनी याकडे लक्ष वेधले होते. निकालापूर्वीही मोदींनी एकापाठोपाठ एक बैठका घेतल्या, ज्यामध्ये नवीन सरकारच्या अजेंड्यावर चर्चा करण्यात आली.
रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी (6 जून) संध्याकाळी मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींची भेट घेतील व नवनिर्वाचित खासदारांची यादी त्यांच्याकडे सुपूर्द करतील. यानंतरच सरकार स्थापनेच्या प्रक्रियेस सुरुवात होईल.
Supriya Sule | अजित पवार गटाचे 10-12 आमदार घरवापसी करणार?, सुप्रिया सुळेंना आले फोन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world