जाहिरात

Vladimir Putin India Visit: पुतिन यांच्यासाठीच्या डिनरला हजेरी, शशी थरूर यांच्यावर काँग्रेस नेते भडकले

Shahsi Tharoor News: थरूर हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा असून त्यांचे काँग्रेसश्रेष्ठींशी विविध विषयांवर मतभेद असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे.

Vladimir Putin India Visit: पुतिन यांच्यासाठीच्या डिनरला हजेरी, शशी थरूर यांच्यावर काँग्रेस नेते भडकले
नवी दिल्ली:

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या सन्मानार्थ एका विशेष भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या भोजन समारंभासाठी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. यामुळे कांग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. हे सगळं होत असताना काँग्रेस खासदार शशी थरूर हे मात्र या विशेष भोजन समारंभाला हजर होते. यामुळे काँग्रेस नेते त्यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. थरूर हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा असून त्यांचे काँग्रेसश्रेष्ठींशी विविध विषयांवर मतभेद असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यातील थरूर यांची भूमिका ही भाजपधार्जिणी झाली असल्याचा संशय काँग्रेस नेत्यांना येऊ लागला असून यामुळेच त्यांनी थरूर यांच्यावर जाहीरपणे टीका करण्यास सुरूवात केली आहे. पुतिन यांच्यासाठी आयोजित डिनरला हजेरी लावल्याने थरूर यांच्याविरोधात काँग्रेस नेते पुन्हा आक्रमक झालेत. 

नक्की वाचा: राष्ट्रपती भवनातील 'त्या' बॉडीगार्डला पुतीन आयुष्यभर लक्षात राहतील; व्हिडीओची जगभरात होतेय चर्चा

डिनरच्या हजेरीमागील कारण समजले

शशी थरुर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले की, ते काँग्रेसचे खासदार आहेत आणि निवडून येण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले आहेत. त्यामुळे पक्ष सोडण्याचा किंवा अन्य कोणताही मोठा निर्णय घेण्याचा विचार करण्यासाठी अनेक बाबींचा सखोल विचार करावा लागेल. परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष असल्याने मला आमंत्रण देण्यात आले होते आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित राहणे हे आपले कर्तव्य होते असे थरूर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या मतदारसंघातील कामांसाठी उपस्थितांशी चर्चा केली, ज्याचा फायदा त्यांच्या मतदारांना होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.  

नक्की वाचा: ना राहुल गांधी ना मल्लिकार्जुन खर्गे!, पुतिन यांच्यासोबत डिनरसाठी काँग्रेसच्या 'या' नेत्याला निमंत्रण

थरूर आणि काँग्रेसमधील तणाव वाढला

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मात्र थरुर यांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले की, ज्या कार्यक्रमातून विरोधी पक्षनेत्यांना वगळण्यात आले, तिथे उपस्थित राहणाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी ठेवावी. जर मला निमंत्रण असते, तर मी अशा कार्यक्रमाला गेलो नसतो. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व आणि थरुर यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थरुर यांनी घेतलेल्या भूमिकेपासून हे अंतर वाढत गेल्याचे दिसते आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com