तेजस मोहितरे, भंडारा: 'अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेले काम सांगा, आम्ही दोन वर्षात केलेले काम सांगतो. दुध का दुध, पानी का पानी होऊन जाऊ द्या,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे, येत्या 23 तारखेला ॲटम बाँम्ब वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या CM चा लाडक्या बहिणींना नमस्कार, दोन वर्षात आपण एवढे काम केले की विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले. आपल्याकडे फटाक्यांची काही कमी नाही. आज मी प्रचारासाठी आलोय, २३ तारखेला विजयाचे फटाके फोडायला येईल. गेल्या दोन वर्षात नरेंद्रने अनेक विकासकामे केली. मी काही उद्घाटन सोहळ्यांना आलो होतो. विकासाचे दुसरे नवा म्हणजे नरेंद्र भोंडेकर. त्याच्या कामामुळेच महायुतीमधील सर्वजण आज एकत्र आलेत. मी स्वतः नरेंद्रच्या मागे मी उभा आहे. एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा तन मन धनाने काम करतो, तेव्हा काय विकास होतो, याचे उदाहरण म्हणजे नरेंद्र आहे.
राहुल गांधींवर निशाणा
'दिल्लीतला फुसका फटाका काल महाराष्ट्रात येऊन गेला. कसलीतरी पंचसूत्री का थापासुत्री मारुन गेला. आपल्या या धडाकेबाज योजनांमुळे सगळ्यांच्या तोंडाला फेस आला आहे. बुरी नजरवाले तेरा मुह काला. आपल्याच सगळ्या योजना त्यांनी ढापल्यात असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. आम्ही लाडक्या बहिणींना ओवाळणी देत होतो तेव्हा विरोधक म्हणत होते भीक देताय का? लाच देताय का? आता लाडक्या बहिणींचा तोंडचा खास पळवण्यासाठी विरोधक कोर्टात गेले. या योजनेला बदनाम केले. एकीकडे विरोध करायचा आणि आपल्या वचननाम्यातून योजना ढापायच्या, असे विरोधक करत आहेत. आम्ही बोलतो ते करुन दाखवतो. हे दोन्ही हाताने देणारे सरकार आहे. जसं २० नोव्हेंबरला मतदान होईल. तात्काळ आचारसंहिता संपताच डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिला.
मविआवर टीकास्त्र
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 'आपण जे बोलतो ते देतो. काँग्रेस महाविकास आघाडीचे इतर राज्यांमध्ये बघितलं कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये, हिमाचलमध्ये योजना जाहीर केल्या मते घेतली निवडून आले. नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे. आपले प्रिंटिंग मिस्टेकवाले सरकार नाही. शेतकर्यांच्या धान्याला पुढच्या काळामध्ये पंचवीस हजार रुपयेचा दर केल्याशिवाय आपण राहणार नाही,' असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world