Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमधील मतमोजणी आज पूर्ण होणार असून नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार? याचा फैसला आता अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. त्याआधी काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केला असून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
काय म्हणालेत सचिन पायलट?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन दावे- प्रतिदावे सुरु झालेत. अशातच काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत सर्वात मोठे आणि सूचक विधान केले आहे.
'महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच बहुमत मिळाल्यानंतर आघाडीतील घटक पक्षांना मुख्यमंत्रीपदाचा निर्णय व्हायला वेळ लागणार नाही. कोणाला कोणते पद द्यायचे' या निर्णयाला एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही,' असा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. त्यामुळे मविआमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयावर एकमत झाले आहे का?अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
नक्की वाचा: निकालाआधीच विजय फिक्स; 'या' 10 दिग्गजांचे बॅनर्सही झळकले!
'महाराष्ट्रातील मतदारांमध्ये परिवर्तनाची स्पष्ट इच्छा आहे. कारण जे 'डबल इंजिन' सरकार चालवत होते ते त्यांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करत नव्हते. आम्ही ज्या प्रकारचा प्रचार केला. आम्ही ज्या प्रकारची आश्वासने दिली, आमचे युतीचे घटक पक्ष, उमेदवारांची निवड, तसेच प्रचारामधील घोषणा सकारात्मक होत्या आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणूनच मला वाटते की महाराष्ट्रात सत्ता बदल होणार आहे, असा विश्वास सचिन पायलट यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. काँग्रेस हायकमांडने त्यांना
मराठवाडा विभागाची जबाबदारी सोपवली होती.तसेच सचिन पायलट यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि पोटनिवडणूक मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता. त्यांनी राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकूण 55 जाहीर सभा घेतल्या. त्यापैकी 2 डझनहून अधिक सभा एकट्या महाराष्ट्रात होत्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world