संजय तिवारी, नागपूर: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदावर दावा करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला. या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढू लागला आहे. काँग्रेसचे नागपूर मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर तोफ डागली असून पटोले हे संघाचे हस्तक असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर विधानसभेलाही काँग्रेसची जादू दिसेल असे चित्र होते. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची दाणादाण उडाली. काँग्रेसला या निवडणुकीत केवळ १६ जागा मिळल्या. धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार समजले जाणारे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला आहे.
नक्की वाचा: Big News : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार, खात्रीलायक सूत्रांची माहिती
नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. त्यांना संघामध्येच पाठवावे, असा घणाघात बंटी शेळके यांनी केला आहे. स्वतः राहुल गांधी यांनी मला उमेदवारी दिली होती. मात्र माझा घात होईल, अशी मला कल्पना नव्हती. माझ्या प्रचारातून काँग्रेसची संघटना गायब होती. कोणत्याही बड्या नेत्याची सभा माझ्या मतदार संघात होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली.. असा घणाघात बंटी शेळके यांनी केला आहे.
दरम्यान, मध्य नागपूर मतदार संघातून काँग्रेस चे दोन वेळेचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कठोर टीका केली होती आणि पटोले यांना आरएसएसचे एजंट म्हटल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कठोर पाऊले उचलणार असल्याचे सांगितले जात आहे. बंटी शेळके यांच्यावर सहा वर्षांची निलंबन कारवाई करण्याचा विचार असल्याची माहिती काँग्रेसच्या उच्च पदस्थ सूत्रांकडून मिळाली आहे.
महत्वाची बातमी: Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार? आता या महिलांनाच मिळणार लाभ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world