जाहिरात

Raigad Rain Fury: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! 6-7 गावांचा संपर्क तुटला; कुंडलिका,अंबा कोपल्या

माणगाव तालुक्यातील कुंभे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली आहे. माती, दगड-धोंडे आणि झाडे झुडपे रस्त्यावर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.

Raigad Rain Fury: रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! 6-7 गावांचा संपर्क तुटला; कुंडलिका,अंबा कोपल्या
महाड:

प्रसाद पाटील

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने जिल्ह्यातील नद्या, धरणे, पूल आणि रस्त्यांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थितीची भीती वाढली आहे.

नक्की वाचा: राज्यात पुढील 24 तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट, कोकणात ऑरेंज अलर्ट

सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सावित्री नदी इशारा पातळीवर, तर अंबा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. याशिवाय कुंडलिका नदीदेखील इशारा पातळीवरून वाहू लागली आहे. सततचा पाऊस सुरूच राहिल्यास नद्यांचा पाणीस्तर आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

महाड तालुक्यात पूल पाण्याखाली

महाड तालुक्यातील सांदोशी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तब्बल 6 ते 7 गावांचा संपर्क तुटला आहे. वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

म्हसळ्याला पावसाने झोडपले

म्हसळा तालुक्यात पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. लेप गौळवाडी येथे एका घराची संरक्षण भिंत कोसळली, तर ढोरजे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने ढोरजे, कुडतुडी, गौळवाडी व देवघर कोंड या गावांचा संपर्क तुटला आहे. शहरातील मुख्य रस्ता, दिघी रोड परिसर व तहसील कार्यालय परिसर पाण्याखाली गेला असून, तहसील कार्यालय जलमय झाले आहे. या गंभीर परिस्थितीची मंत्री आदिती तटकरे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

नक्की वाचा: ठाण्यातील शाळा, कॉलेजना उद्या सुट्टी, शिक्षकांना मात्र कामावर यावेच लागणार

माणगावात दरड कोसळली

माणगाव तालुक्यातील कुंभे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली आहे. माती, दगड-धोंडे आणि झाडे झुडपे रस्त्यावर आल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. ग्रामस्थांची गैरसोय वाढली असून, प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 हेटवणे धरणाचे दरवाजे उघडले

पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रायगडमधील पोलादपूर, अलिबाग, श्रीवर्धन, सुधागड, तळा, इंदापूर आणि कोलाड या तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू असून, डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा: मुंबई आणि उपनगरांत सर्वाधिक पाऊस कुठे झाला ? आकडेवारी पाहून आश्चर्य वाटेल

प्रशासन सतर्क

जिल्हा प्रशासनाने सर्व आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क ठेवली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सुरक्षित ठिकाणी राहावे, तसेच कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसाने निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून, प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com