
गुरुप्रसाद दळवी
कोकण रेल्वे मार्गावरील पिंगुळी येथे रेल्वेचे रूळ चोरी करून त्याचा वापर तेथीलच एका स्मशानभूमीच्या बांधकामासाठी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही चोरी कोकण रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून झाली असल्याचा आरोप केला जात आहे. चोरीच्या मालातून उभ्या केलेल्या स्मशानाच्या बांधकामाचे बिल घोटाळेबाजांनी राज्य सरकारकडून वसूल केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.
( नक्की वाचा: 45 कोटींचा खर्च, मिळाले फक्त 60 हजार; बॉलीवूडचा महाफ्लॉप चित्रपट कोणता आहे ओळखा पाहू )
या प्रकरणात रेल्वे कर्मचारी व स्थानिक ठेकेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या चोरीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांनी केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मंगळवारी कणकवलीतील रेल्वे पोलीस ठाण्यात जोरदार आंदोलन केले.
( नक्की वाचा: ईव्ही चालवणाऱ्यांनो सावध व्हा! ब्रेक आपोआप निघाला, गाडीचा डेंजर अपघात )
माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी यावेळी उपस्थित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र रेल्वे पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पिंगुळी येथील रेल्वे रुळाची चोरी झाल्याची तक्रार झाल्यानंतर संबंधित स्मशानभूमीतून रेल्वे रूळ हटवण्यात आले आणि त्याऐवजी दुसऱ्या प्रकारचे खांब वापरून काम सुरू ठेवले गेले, असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केला. या आंदोलनादरम्यान रेल्वे अभियंता, रेल्वे पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वादावादी झाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world