मंगेश जोशी, जळगाव
Eknath Khadse:रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेल्या रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच महिला खासदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे एकनाथ खडसेंचं बळ वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये घरवापसीच्या प्रतीक्षेत असलेल्या एकनाथ खडसेंना मात्र राज्यातीलच महायुतीच्या नेत्यांकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांची जरी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली असली तरी एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार की प्रतीक्षा करावी लागणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे... पाहुया याबाबतचा खास रिपोर्ट...
(नक्की वाचा: कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर)
एकनाथ खडसेंच्या पाठबळामुळे माझा विजय - रक्षा खडसे
नाराजी व्यक्त करत एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्टी देऊन शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीमध्ये उशीरा का होईना पण विधान परिषदेवर एकनाथ खडसेंना पाठवून राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंचे पुनर्वसन देखील करण्यात आले. त्यातच लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे थेट जयंत पाटील यांनी जळगावमधील सभेत जाहीर केलं होतं. तर एकनाथ खडसे यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत वेळप्रसंगी भाजपने रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास रक्षा खडसेविरोधात देखील आपण निवडणूक लढवू असे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले होते. मात्र राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी व भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारीबाबत असणारी साशंकता यामुळे कुठेतरी एकनाथ खडसे यांनी आपल्या निर्णयात परिवर्तन करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राम राम ठोकून भाजपामध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. एकनाथ खडसे यांच्या निर्णयानंतर रक्षा खडसे यांना उमेदवारी देखील मिळाली व स्वतः एकनाथ खडसे यांनी देखील रक्षा खडसे यांचा प्रचार केला व रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्यांनी विजयी देखील झाल्या. तर एकनाथ खडसे यांच्याच पाठबळामुळे आपला विजय झाला असल्याचं मत स्वतः रक्षा खडसे यांनी देखील व्यक्त केले.
(नक्की वाचा: Modi 3.0: केरळमध्ये भाजपचे खाते उघडले, सुरेश गोपींना थेट मिळाले मंत्रिपद)
खडसेंची भाजपवर टीका
लोकसभा निवडणुका होऊनही एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश अद्यापही प्रलंबित असून लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर बोलताना एकनाथ खडसे यांनी फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यात महायुतीला अपयश आल्याचे म्हणत भाजपवरच याचं खापर फोडलं. त्यामुळे एकीकडे खडसे भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचे म्हणतात तर दुसरीकडे खडसेंकडूनच भाजपवर टीका केली जाते. ही एकनाथ खडसेंची दुटप्पी भूमिका असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
एकनाथ खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील
एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय वैरी मुक्ताईनगरचे अपक्ष व शिंदे गट समर्थक आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला जरी विरोध केला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून रक्षा खडसे यांचा प्रचार केला. पण एकनाथ खडसे यांच्याबाबत आजही चंद्रकांत पाटलांचा विरोध कायम असून एकनाथ खडसेंच्या भाजपप्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी संशय व्यक्त करत खडसेंसंदर्भात कुठलीही अपेक्षा करण्यात अर्थ नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणतात.
(नक्की वाचा: Modi Cabinet : मोदींंच्या मंत्रिमंडळात 6 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश)
एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत भाजपच्या आमदारांकडूनही साशंकता व्यक्त केली जात असून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं काही चित्र दिसत नसल्याचे मत भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला आहे.
तरीही एकीकडे या सर्व चर्चा सुरू असताना मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला एकनाथ खडसे हीच सर्वात मोठी महायुतीसाठी अडचण ठरणार असल्याचं वाटत आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले एकनाथ खडसे हे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असं असल्याचे म्हणत महायुतीचे नेते अनिल पाटलांनी थेट एकनाथ खडसेंना शपथविधी सोहळ्यासाठी बोलवले नसल्याचा चिमटा काढत खडसेंची पक्षप्रवेशाची चर्चा फक्त दिल्लीत झाली गल्लीत त्यावर कुठलीही चर्चा नसल्याचे म्हणत एकनाथ खडसेंमुळे महायुतीचे नुकसान होत असेल तर अशा लोकांना पक्षात घेऊ नये असा थेट विरोध राष्ट्रवादीने व्यक्त केला आहे.
एकीकडे घरवापसीची प्रतीक्षा तर दुसरीकडे महायुतीतीलच नेत्यांचा विरोध या दुहेरी संकटात रक्षा खडसेंचं मंत्रिपद एकनाथ खडसेंना बळ देणारं ठरणार की आपलं राज्यातलं वर्चस्व एकनाथ खडसे स्वतः सिद्ध करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
Narendra Modi Oath Ceremony 2024 | रक्षा खडसे यांनी घेतली राज्य मंत्रिपदाची शपथ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world