जाहिरात

भाजप विरोधकांना मदत केल्याचा आरोप, दिव्या स्पंदनाशी तुलना; कोण आहेत श्वेता शालिनी?

कर्नाटकची अभिनेत्री आणि एकेकाळी काँग्रेसच्या सोशल मीडियाची धुरा वाहणाऱ्या अभिनेत्री रम्या उर्फ दिव्या स्पंदना हिच्याशी श्वेता शालिनी यांची तुलना करून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या टीकेनंतर संतापलेल्या श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकरांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची घोषणा केली होती.

भाजप विरोधकांना मदत केल्याचा आरोप, दिव्या स्पंदनाशी तुलना; कोण आहेत श्वेता शालिनी?
मुंबई:

भाजपच्या वर्तुळात प्रसिद्ध असणारे मात्र महाराष्ट्राला फारसे परिचित नसलेले एक नाव काल परवा अचानक हेडलाईन्समध्ये आणि बातम्यांमध्ये झळकायला लागले. पत्रकार आणि युट्युबर भाऊ तोरसेकर यांनी एक व्हिडीओ त्यांच्या युट्युब चॅनेलवरून प्रसिद्ध केला. या व्हिडीओमुळे श्वेता शालिनी नाव अचानक प्रकाशझोतात आले. कर्नाटकची अभिनेत्री आणि एकेकाळी काँग्रेसच्या सोशल मीडियाची धुरा वाहणाऱ्या अभिनेत्री रम्या उर्फ दिव्या स्पंदना हिच्याशी श्वेता शालिनी यांची तुलना करून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या टीकेनंतर संतापलेल्या श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकरांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची घोषणा केली होती.

भाऊ तोरसेकर हे भाजपच्या बाजूने आपली मते सातत्याने मांडत असतात. त्यांनी श्वेता शालिनी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्र भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. शालिनी यांनी तोरसेकरांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा टोकण्याची भाषा केल्याचे कळताच भाजपमध्ये याबाबत चर्चेला सुरुवात झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:या प्रकारामध्ये लक्ष घातले असे सांगितले जाते. वरिष्ठांनी श्वेता शालिनी यांना कडक शब्दात समज दिल्यानंतर शालिनी नरमल्या आणि त्यांनी भाऊ तोरसेकरांना पाठवलेली नोटीस आपण मागे घेत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया आणि आयटी विभागाच्या प्रभारी असलेल्या श्वेता शालिनी यांनी X वर पोस्ट करत म्हटले की,

2024  च्या लोकसभा निवडणूकीत माझ्याकडे मीडिया आणि जाहिरात किंवा कोणत्याही प्रकाचे काम कोणत्याही कंपनीला देण्याचे कोणतेही अधिकार नव्हते त्यामुळे कोणालाही मदत करणे विशेषकरून विरोधी विचार सरणीच्या लोकांना मदत करणे तर शक्यच नाही. आपणांस कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि त्यातून हा प्रकार घडला. पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून याची तक्रार मी वरीष्ठ नेतृत्वाकडे केली आणि त्यांनी एक समिती बनवून या खोटी माहिती देण्याविषयी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मला दिले. माझी आपणास एवढीच विनंती आहे की, ज्या लोकांनी आपणस चुकीची माहिती देवून माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांची नावे वरिष्ठ लोकांकडे देण्याचे सहकार्य आपण कराल.

भाऊ तोरसेकरांनी काय म्हटले होते?

भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या युट्युब चॅनेल प्रतिपक्षवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, "मी एका अजब व्यक्तीचे नाव ऐकले ते म्हणजे श्वेता शालिनी,त्या आयटी सेलच्या प्रमुख आहेत असं मी ऐकलं आहे. निकालापर्यंत भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख कोण आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार कसा करायचा, कोणाला कशी मदत करायची, कोणाला काय आर्थिक किंमत द्यायची याचे अधिकार श्वेता शालिनींकडे होते आणि त्यांनीच सगळा गोंधळ घातला अशा शेकडो कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या. भाजपला टारगेट करणारे यु्ट्युब चॅनेल, वाहिन्या, पत्रकारांना पॅकेजेस कशी दिली गेली? भाजपच्या प्रचारासाठीचा खर्च भाजपच्या अस्सल टीकाकारांकडे पोहोचवला गेला. त्यांच्याकडून एक जाहिरातवजा काहीतरी लिहून घेतलं गेलं. पण बाकी ते नियमित व्रतस्थ असल्यासारखे भाजपला झोडपत असतात. भाजपला मदतनीस ठरणाऱ्या अनेक पत्रकारांना वंचित ठेवण्यात आलं.

या तक्रारी भाजप पाठीराखे किंवा कार्यकर्त्यांकडून येतात तेव्हा 5 वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये धूमाकूळ घालणाऱ्या दिव्या स्पंदना नावाची आठवण येते. भाजपने आत्मचिंतन करताना लोकसभा निवडणुकीत आपण साधने कशी चुकीच्या रितीने वापरली याचेही आत्मचिंतन होणे गरजेचे आहे."
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Facebook.com/gbhautorsekar

कोण आहेत श्वेता शालिनी?

कालपर्यंत महाराष्ट्राला फारसे माहिती नसलेले नाव भाऊ तोरसेकरांनी केलेल्या व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आले. अनेकांना प्रश्न पडला की या श्वेता शालिनी आहेत तरी कोण? श्वेता शालिनी यांच्या X अकाऊंटवर त्यांची माहिती तपासली असता त्यांनी स्वत:ची ओळख भाजप प्रवक्त्या, सोशल मीडिया आणि आयटी विभागाच्या राज्य प्रभारी, महाराष्ट्र मीडिया प्रभारी-तेलंगाणा, धोरणी उद्योजिका, वक्त्या आणि स्तंभ लेखिका अशी करून दिली आहे.

Latest and Breaking News on NDTV

आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार श्वेता शालिनी या मूळच्या बिहारच्या असून त्यांचे वडील सैन्यात होते. पुण्यातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी एमबीएची पदवी मिळवली होती. काही काळ खासगी कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची आयटी कंपनी स्थापन केली होती. महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. निती आयोगाच्या त्या सल्लागार आहे.2011 साली श्वेता शालिनी भाजपच्या संपर्कात आल्या. 2014 साली श्वेता शालिनी भाजपच्या राज्याच्या सोशल मीडिया टीममध्ये त्या दाखल झाल्या होत्या.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Facebook.com/shweta.shalini2

दिव्या स्पंदना कोण आहेत?

कन्नड अभिनेत्री दिव्या स्पंदनाचे चित्रपटासाठी धारण केलेले नाव 'रम्या' आहे. अभिनय क्षेत्रात हात आमजावल्यानंतर दिव्या स्पंदना हिने राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला होता. मंड्या लोकसभा मतदारसंघातून तिने पोटनिवडणूक जिंकली होती.  दिव्या स्पंदनाकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सोशल मीडियाची सूत्रे सोपवण्यात आली होती.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: facebook.com/ramyaactressofficial

दिव्या स्पंदना हिने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मर्जी संपादन केली होती ज्यामुळे ती मनमानीपणे आपला कारभार करत होती असा आरोप केला जातो. निवडणुकीतील पराभवानंतर दिव्या स्पंदनावर जबरदस्त टीका झाली होती. दिव्या स्पंदना हिने 8 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपही केला गेला. हे सगळे आरोप आपली बदनामी करण्यासाठी केले जात असल्याचा आरोप दिव्याने केला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'बदलापूरच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या' कोणी केली मागणी?
भाजप विरोधकांना मदत केल्याचा आरोप, दिव्या स्पंदनाशी तुलना; कोण आहेत श्वेता शालिनी?
Dharmaraobaba Atram daughter bhagyashree-atram-joins-ncp-sharad-pawar-faction
Next Article
'बाबा वाघ तर मी वाघीण, वाघीण जास्त घातक' धर्मरावबाबांच्या लेकीचं पहिलचं भाषण गाजलं