सौरभ वाघमारे, सोलापुर: राज्यात 288 विधानसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. राज्यभरात मतदानासाठी सकाळपासून नागरिकांची गर्दी होत असतानाच सोलापूरमध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांनी अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवारामागे आपली ताकद दिली आहे. सुशिलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडगी यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला आहे. सुशिलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन या मतदारसंघातील जनतेला केले आहे.
प्रणिती शिंदे यांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देत महाआघाडीचा धर्म पाळला असल्याचा दावा केला आहे. ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
नक्की वाचा: "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी
दरम्यान, सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र याठिकाणी काँग्रेसकडूनही अनेक जण इच्छुक होते. धर्मराज काडादी यांनीही याठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महत्वाचं म्हणजे काँग्रेसनेही ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये सहभागी न घेता अपक्ष काडादी यांनाच अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता.
यावरुनच खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रणिती शिंदेंना आवाहन केले होते. लोकसभेला मी प्रचारासाठी आलो होतो, आता आमच्या उमेदवाराला साथ द्या असं ते म्हणाले होते. मात्र आता अखेरच्या क्षणी ठाकरेंचे आवाहन फेटाळून अपक्ष उमेदवार काडादी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
महत्वाची बातमी: MNS Letter : बनावट पत्राने वरळीत मनसेचं टेन्शन वाढलं, काय आहे पत्रात?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world