जाहिरात

Sushma Andhare Letter: '...तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर', सुषमा अंधारेंचं डोळ्यात अंजन घालणारं पत्र!

Sushma Andhare Viral Letter: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहलेले पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

Sushma Andhare Letter: '...तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर', सुषमा अंधारेंचं डोळ्यात अंजन घालणारं पत्र!

Sushma Andhare Letter: तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पुण्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार  अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 10 लाख रुपये भरल्याशिवाय उपचार सुरु करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तनिषा भिसेंना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून आमदारांच्या पीएची ही अवस्था तर सामान्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. यावरुनच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहलेले पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे सुषमा अंधारेंचे पत्र? वाचा जशेच्या तसे...

प्रिय कार्यकर्ता दादा / ताई...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्याला लिहावं बोलावं असं फार आतून वाटत आहे. पोटात खोलवर खड्डा पडल्यासारखं वाटतंय.. दोन-तीन वेळा तर लिहून पुन्हा सगळं खोडून टाकावं असं वाटलं.. पण हे लिहिलं पाहिजे बोलल पाहिजे. काल परवा सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिने जीव गमावला. मातृत्वाची अनिवार ओढ दुःखद करुणकथेमध्ये विसावली. रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई होईल का यावर शंकाच आहे. 

रुग्णालयाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली. सरकारही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहायता कक्ष यांचा भोंगळ कारभार उघडा पडला.  नेमलेले आयोग समित्या चहा बिस्किटांपुरत्या असे सिमित राहतील. आजवरच्या कुठल्याही आयोग किंवा समितीने सरकारी यंत्रणेला दोषी धरलेलं नाही किंवा तसा अहवाल दिला तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही. 

नक्की वाचा - Amit Gorkhe News: 'खोटारडेपणाचा निषेध...', मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आमदार अमित गोरखेंचा संताप
        
अजून आठ पंधरा दिवसात रुग्णालय प्रशासन आणि सरकारचे लागेबांधे यामध्ये मानवी जीवाचा कोलाहल विरू असमेदनशीलता हलगर्जीपणा दप्तर दिरंगाई, दवाखान्यांचे कत्तलखान्यातले रूपांतर याही चर्चा हळूहळू मागे पडतील. पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील. मुळात हा जीव का गेला. दहा लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का? ज्या देशाचे पंतप्रधान ऑन रेकॉर्ड सांगतात की 80 कोटी जनता रेशनिंगचे धान्य खाते. अशा रेशनिंगचा धान्य करणाऱ्या जनतेला एका प्रसुतीसाठी 10 ते 20 लाख रुपये दवाखान्यात भरणे शक्य आहे का? 

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्वियसहाय्यक म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी? सुशांत भिसे यांची पत्नी तनिषाचा मृत्यू हे एक निमित्त आहे. पण या निमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे. कुठल्याही पुढाऱ्याच्या मागे कार्यकर्ता दिवस-रात्र पळत असतो. नेत्यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा करत नाही आपली बायका मुलं रस्त्यावर येतील का.. त्यांच्या काही दैनंदिन गरजा आहेत का ? आरोग्य , शिक्षण, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता झाली आहे का ? याचाही विचार न करता कार्यकर्ता पुढार्‍यांच्या मागे उर फुटेस्तोर,  धावत राहतो. त्याच्या या धावण्याची किंमत नेता बनवणाऱ्या संबंधिताला खरंच असते का? 

Sanjeev Sanyal : आधी हटवण्याचे आदेश, 2 दिवसांनी पुन्हा कुलपतीपदी, पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नक्की काय सुरू आहे?

खरच एखाद्या आमदाराच्या घरातल्या स्त्रीला अशा आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती तर आमदार कुठल्यातरी योजनेमध्ये बसवता येते का किंवा अजून कुणाकडून फोन करता येतील का यासाठी धडपडत राहिले असते की, रुग्णालय प्रशासनाला पुन्हा कधीतरी धडा शिकवता येईल पण आत्ता आपल्या घरातल्या स्त्रीचा जीव वाचवणे गरजेचे आहे याचा विचार केला असता. मला जर माझ्या कार्यकर्त्याला जो माझ्यासाठी 24/7 घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल. आणि त्याच्या कुटुंबाप्रति माझ्या जबाबदारीचा मला भान नसेल तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर.. !!!

सोलापूरचे निर्मला यादव भाजपच्याच एका विंगमध्ये काम करायच्या. मात्र आज त्यांची अवस्था मृत्यूपेक्षाही भयंकर होण्याला कोण कारणीभूत आहे?  ज्या पक्षासाठी दिवस रात्र जीव झिजवला ती लोक मदतीला पुढे का आली नाही? संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांच्या हत्येशी संबंधित सगळे पुरावे ग्रह खात्याच्या हाताशी असताना सुद्धा गृह खात्याने ते पुरावे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी तीन महिने दडवून ठेवले आणि मराठा ओबीसी तणाव वाढवला.   कार्यकर्त्याच्या जीवापेक्षा राजकीय अजेंडा महत्त्वाचा वाटला. 

Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!

उदगीरमध्ये नोकरी करत होते. पन्नाशीच्या पुढचे दोन-तीन जेष्ठ कार्यकर्ते नित्य नियमाने येता जाता बस स्टैंड वर भेटायचे. कधी कधी चहा व्हायचा. मग ते गप्पांमध्ये बोलायचे. अमक्या ला आमदार कुणी केलं आम्ही केलं. तमक्या विधान परिषदेवर कुणामुळे गेला आमच्यामुळे. मला फार आश्चर्य वाटायचं एवढ्या लोकांना आमदार करणारी ही माणसं अशी हिनदीन अवस्थेत का दिसत असतील. एखाद्या नेत्यासोबत त्याचा कार्यकर्ता किंवा हरकाम्या म्हणून रेल्वेने जनरल डब्यात प्रवास करत मुंबईला निघायचं. 

शबनममध्ये एखादा स्टार्च करून ठेवलेला ड्रेस. रेल्वेतून उतरलं की कुठल्यातरी सुलभ शौचालयमध्ये फ्रेश व्हायचं. स्टार्चचे कपडे घालायचे. दिवसभर त्या नेत्याची बॅग घेऊन किंवा त्याचे वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढत त्याच्या मागे फिरायचं. संध्याकाळी पुन्हा सुलभ शौचालय गाठायचं स्टार्च चे कपडे पिशवीत ठेवायचे. चूरगळलेला ड्रेस अंगावर घालायचा. रेल्वेत बसण्याआधी इंग्रजी पेपर घ्यायचा. इंग्रजीत का तर याच्यात पाने जास्त असतात. समजा रेल्वे जागा नाहीच मिळाली तर खाली अंथरायची सोय पेपर मुळे होईल.

हे वाचायला कडवट आहे वाईट आहे पण सत्य आहे. जगाला साम्यवादाचा तत्त्वज्ञान सांगणारा मार्क्स सुद्धा अत्यंत हलाखीच्या अवस्थेत त्याचा शेवट झाला. त्याच्या पक्षात त्याचे पुस्तक फ्रेडरिक एंजल्स या त्याच्या मित्राने प्रकाशित केली. एखाद्या नेत्याचा लेफ्ट हॅन्ड राईट हॅन्ड, निकटवर्तीय, सावली, अशी विशेषणे लावून फिरणारा कार्यकर्ता खरंच संकट काळात त्याच्या मदतीला कोणी नेता येतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीचे दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रकल्भ होत नाही. 

Kajal Atpadkar: माणदेशी कन्येची यशस्वीझेप! आई-वडील ऊसतोड कामगार, लेकीची भारताच्या हॉकी संघात निवड

नेत्याने नुसता पाठीवर हात टाकला की फुरफुरणारे कार्यकर्ते, नेत्यांनी आपल्याला चारचौघात ओळखीच्या आवाजाने हाक मारली याने हरखून जाणारे, नेत्यासाठी सोशल मीडियात बाजू मांडून स्वतःवर केसेस ओढवून घेणारे दादाहो हे सगळं करण्याच्या आधी तुमच्या कुटुंबाचा विचार करा. तुमच्या आपत्कालीन स्थितीमध्ये तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही सोबत असणार नाही याच भान असू द्या. नेत्याच्या सांगण्यावरून माती भडकवून दंगलींमध्ये सामील होणारे उद्या कोर्टकचेऱ्यांमध्ये जमातीसाठी कागदपत्रांची जमवाजमव करायला तुमच्या घरातली वृद्ध आई, 10 ते 5 च्या शिफ्ट काबाडकष्ट करणारा भाऊ.

 गेलातच तुम्ही तुरुंगात तर धुणीनी भांडी करून तुमच्या चिलापिलांना सांभाळणारी तुमची बायको याच्याशिवाय दुसरा कोणीही मदतीला येणार नाही. तेव्हा या मृगजळाच्या मागे धावण्यापेक्षा आपले अर्थकारण सक्षम करण्याकडे लक्ष देणे अधिक चांगले.छत्रपती शिवराय एखादा गड किल्ला आधी स्वतः चढण्यासाठी सज्ज व्हायचे मग त्यांच्या मागे मावळे यायचे. कार्यकर्त्याला सांगण्याच्या आधी जो स्वतः एखादा धोका पत्करायला सहज तयार होतो अशा नेत्यासोबत उभे राहायला हरकत नाही. मात्र "तुमलढो हम कपडे सांभालते हैं" या टाईपच्या भुरट्या लोकांपासून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सावध व्हा. जो दुसऱ्या वरी विसंबला.. त्याचा कार्यभार संपला.

Maharashtra Politics: भाजपला 'खोचक' शुभेच्छा, मराठीवरुन मनसेलाही डिवचलं; उद्धव ठाकरे काय म्हणाले?