मुंबई: 'उद्या पाच वाजता विधानसभेचा प्रचार संपणार. मग बातम्या येणार प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तोफा महाविकास आघाडीकडे आहेत. महाझुटीकडे थापा थंडावणार आणि त्यानंतर 23 तारखेला महायुती संपणार', असे म्हणत शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर सडकून टीका केली. मुंबईमध्ये, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरेंनी मोदी शहांसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'आजची सभा मुंबईसाठी आहे. ही लढाई कोण जिंकणार महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्र प्रेमी जिंकणार? छत्रपती शिवरायांचा मावळा जिंकणार की मोदी शहांचा नोकर जिंकणार? हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे घडतंय ते या सरकारला मुंबईचा जीडीपी वाढवायचा आहे. त्यासाठी संपूर्ण मुंबई बिल्डर्स, डेव्हलपर्स देऊन टाकण्याचा त्यांचा डाव आहे. आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्व संपवायचा डाव आहे. मुंबईची ब्लु प्रिंट निती आयोगाच्या माध्यमातून बनवली ज्यामध्ये महत्वच काढून टाकलं आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
'काय तर म्हणे बटेंगे तो कटेंगे.. मी मुख्यमंत्री असताना अशी कोणाची हिंमत झाली नव्हती. आता मोदी असूनही असुरक्षित वाटत असेल तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या. मग शिवसेना कशी काम करते ते बघा. कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र? राजकीय पोळ्या भाजण्यासाठी लोकांची घरे जळावीत असे त्यांचे हिंदुत्व आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारावरुन संताप व्यक्त केला.
'२३ तारखेला आपण जिंकणार आहे फटाके फुटणार आहेत. पण महाझुटी जिंकली तर गुजरातमध्ये फटाके फुटतील. खरतंतर मला पंकजा मुंडेंचे आभार मानायचे आहेत. त्यांनी पंकजा ताई, तु महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी काढलीस. त्यांनी सांगितलं की भाजपचं काम जोरदार असतं. राज्यातील ९० हजार बुथसाठी दक्षता पथक म्हणून गुजरातमधून माणसं आणलीत. आपल्यावर नजर ठेवायला गुजरातची माणसं. आज नजर ठेवायला आणलीत, उद्या मुंबई आणि महाराष्ट्र बळकावतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मर्दांची अवलाद असाल तर स्वतःच्या बापाचे नाव लावून मैदानात ये, असे थेट आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
महत्वाची बातमी: निवडणूक महाराष्ट्राची पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा का?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world